केंद्रीय मंत्र्यांनाही बसला खड्ड्यांचा फटका; अस्वच्छतेबद्दल ठाकूर यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 07:57 AM2022-09-13T07:57:16+5:302022-09-13T07:57:36+5:30

ठाकूर यांनी केडीएमसी मुख्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी पालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूमला भेट दिली

Union ministers were also hit by potholes; Anurag Thakur's displeasure about unsanitary conditions | केंद्रीय मंत्र्यांनाही बसला खड्ड्यांचा फटका; अस्वच्छतेबद्दल ठाकूर यांची नाराजी

केंद्रीय मंत्र्यांनाही बसला खड्ड्यांचा फटका; अस्वच्छतेबद्दल ठाकूर यांची नाराजी

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांत असलेल्या खड्ड्यांचा फटका बसल्याने हे शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांत आहे का? असा प्रश्न केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना विचारला. खडे बोल सुनावत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामाविषयीही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शहरातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली.

ठाकूर यांनी केडीएमसी मुख्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी पालिकेच्या स्मार्ट सिटी कंट्रोल रूमला भेट दिली आणि प्रकल्पांसंदर्भात एक चित्रफीत पाहिली. तेव्हा त्यांनी रस्त्यांतील खड्ड्यांचा मुद्दा काढला. अन्य शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविले गेले. तेथील रस्ते चांगले झाले. शहरे सुशोभित झाली. स्वच्छता वाढल्याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले.

३७०० रुपयांत घर कसे चालवायचे? 
आम्ही ३७०० रुपयांत घर कसे चालवायचे, असा सवाल कल्याणमधील आशा सेविकांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना केला व पगारवाढीकरिता साकडे घातले. आशा सेविकांनी दिलेल्या निवेदनाचा सकारात्मक विचार व्हायला हवा, असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. कल्याण पूर्वेतील नेतिवली, आजदे, पिसवली आरोग्य केंद्रांना भेट दिल्यावर त्यांनी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशासेविका यांच्याकडून माहिती घेतली. तेव्हा आशासेविकांनी पगारवाढीचा मुद्दा मांडला.

समाजगट भाजपशी जोडण्यावर भर 

डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, उद्योजक अशा समाजातील वेगवेगळ्या घटकातील व्यक्तींच्या गाठीभेटी घेत, त्याचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत या गटांनाही भाजपशी जोडण्यावर, त्यांच्या अडचणी सोडवण्यावर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी भर दिला. ठाकूर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आबालवृद्धांची ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यालयात गर्दी झाल्याचे चित्रही या वेळी दिसले. त्यांनीही प्रत्येकाला वेळ देत सेल्फी काढले आणि शुभेच्छा दिल्या. एरव्ही मंत्र्यांचा जसा लवाजमा बघायला मिळतो तसा तो न दिसणे हे या दौऱ्याचे वैशिष्ट्य. ठाकूर हॉल येथे मंत्र्यांना भेटून केंद्र सरकारच्या १३ योजनांतील लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांनी केंद्र सरकारचे लेखी आभार व्यक्त केल्याची पत्रे मंत्र्यांकडे दिली. कोरोनाकाळात सुरू केलेली धान्य वाटप सुविधा अजूनही सुरू ठेवावी, अशी मागणी कल्याण पूर्वेतील लाभार्थ्यांनी व्यक्त केली. व्यापाऱ्यांनी जीएसटीबाबतच्या अडचणी ठाकूर यांच्या कानावर घातल्या. 

सिंधी वाहिनी सुरू करण्याची मागणी 
कल्याण पूर्वेतील नागरिकांनी दूरदर्शनवर सिंधी वाहिनी सुरू करण्याची मागणी केली. समाजाची लोकसंख्या पाहता लवकरच याबाबतचा निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘क्रीडा भारती’च्या कानविंदे सभागृहात ठाकूर यांनी टेबल टेनिस, बॅटमिंटन खेळण्याचा आनंद लुटला. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून खेळातील अडचणींवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Union ministers were also hit by potholes; Anurag Thakur's displeasure about unsanitary conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.