रेल्वे स्थानकात ३० कुत्र्यांची अनोखी लसीकरण मोहीम
By अनिकेत घमंडी | Published: May 20, 2024 07:54 AM2024-05-20T07:54:01+5:302024-05-20T07:55:20+5:30
डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानक आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक मधील सुमारे 30 भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. "पॉज'तर्फे दर वर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे.
रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना "अँटी रेबीज लस' देण्याचा उपक्रम "पॉज'ने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते; मात्र भटक्या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. रविवारी, 19 मे ला डोंबिवली, कोपर रेल्वे स्थानक आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक मधील सुमारे 30 भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली.
ही मोहीम रात्री राबविण्यात येते त्यासाठी 2 कारणे आहेत
1. रात्री प्लॅट फॉर्म रिकामे असतात व राहणारे श्वान दिसून लसीकरण सोपे जाते.
2. दिवसा जास्त तापमानात श्वान लपून बसतात किंवा शेड मध्ये आसरा घेतात, अशावेळी त्याना शोधणे मुश्किल असते.
पुढील टप्प्यामध्ये कल्याण, उल्हास नगर, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे येथेही ही मोहीम राबवण्यात येईल असे पॉज चे स्वयंसेवक प्रशांत बुन्नावार ह्यांनी सांगितले. रेल्वेस्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून "पॉज'तर्फे यांचे लसीकरण येत्या आठवड्यात केले जाणार आहे. दरम्यान, कोपर, ठाकुर्ली रेल्वेस्थानक परिसरातील भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक नीलेश भणगे यांनी दिली.
रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीजसारख्या आजारांची लागण होते. यासाठी प्लॅन्ट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज)ने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पॉज संस्थेचे तीन स्वयंसेवक ऋषिकेश सुरसे, रीमा देशपांडे , सतीश सोहोनी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबवली. गेली 11 वर्षे ही मोहीम पॉज अखंड रित्या रावबत आहे आणि त्यामुळेच कल्याण-डोंबिवली मध्ये आतापर्यंत 1 ही रेबीज मुळे मानव मृत्यू ची नोंद नाही असे निलेश भणगे ह्यांनी सांगितले.