कल्याणच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागतयात्रेच्या ध्वज- लोगोचे अनावरण
By सचिन सागरे | Published: February 27, 2024 02:20 PM2024-02-27T14:20:31+5:302024-02-27T14:20:47+5:30
गुढीपाडव्याला घुमणार जयघोष हिंदुत्वाचा, जल्लोष कल्याणकरांचा
कल्याण - गुढीपाडव्यानिमित्त निघणारी कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा यंदाच्या वर्षी काहीशी विशेष असणार आहे. कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा २५ वे वर्ष असून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणकडे यजमानपद देण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर स्वागतयात्रेच्या ध्वज आणि लोगोचे आयएमए हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. जयघोष हिंदुत्वाचा, जल्लोष कल्याणकरांचा असे ब्रीदवाक्य निश्चित करण्यात आले आहे.
रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढविण्यासाठी गेले वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सभागृहात कल्याणातील स्वागतयात्रेचे प्रणेते डॉ. सुरेश एकलहरे यांच्यासह बांधकाम व्यावसायिक पियूष बोरगावकर, स्वागतयात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील, कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, सचिव विकास सुरंजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागतयात्रा लोगो आणि ध्वजाचे अनावरण करण्यात आले.
सन २००० पासून कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या माध्यमातून हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. त्यामुळे यंदा या स्वागत्यात्रेचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष असून ही स्वागत यात्रा भव्य दिव्य अशी करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणने कंबर कसली आहे. यंदाच्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमांना ६ एप्रिलपासूनच सुरुवात होणार आहे. तर स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ एप्रिलला कल्याण पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानात सांगीतिक संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती स्वागतयात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. तर नविन कल्याण अशी ओळख असणाऱ्या खडकपाडा परिसरातून दोन नव्या उपयात्रा काढण्यात येणार असून त्या पारंपरिकयात्रेमध्ये जोडल्या जाणार आहेत.
या ध्वज आणि लोगो अनावरण सोहळ्याला कल्याण हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी, कल्याण दिवाणी वकील संघटनेचे खजिनदार ॲड जयदीप हजारे, कल्याण संस्कृती मंचचे खजिनदार अतुल फडके, निखिल बुधकर यांच्यासह विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, जायंटस् ग्रुप, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बाइकर्स ग्रुप, भजनी मंडळे, ढोलताशा पथके, गणेशोत्सव मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.