सहव्याधी असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:37 AM2021-03-11T00:37:19+5:302021-03-11T00:37:42+5:30
केडीएमसीकडे लसीकरणानंतर त्रास झाल्याची तक्रार नाही
मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपास राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त कोरोना लसीचे डोस मिळाले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून, त्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांना लस दिली जात आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणानंतर एकाही ज्येष्ठ नागरिकाने त्रास झाल्याची तक्रार मनपाकडे केलेली नाही. लसीकरणानंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ज्येष्ठ व सहव्याधी असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
केडीएमसीने पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कर्मचारी यांना लस दिली. तर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करसाठी लसीकरण सुरू झाले. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व सहव्याथी असलेल्यांसाठी मनपा रुग्णालयात मोफत तर, खासगी रुग्णालयात शुल्क आकारून लस दिली जात आहे. सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण लवकर होते. त्यामुळे त्यांना कोविड आणि नॉनकोविड रुग्णलयात उपचार घेणे जिकिरीचे झाले होते. कोरोनापासून बचावासाठी त्यांना तातडीने लस देण्याची मागणी केली जात होती.
काय म्हणतात तज्ज्ञ...
उपचार सुरू असलेल्या सहव्याधी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यांनीच लस घ्यावी. रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्यांना रक्त पातळ करण्याच्या गोळ्या दिल्या जातात. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- डॉ. नितीन बोटकोंडले, फिजीशियन
डायलिसीसच्या रुग्णांचे रक्त पातळ करावे लागते. ज्यांचे डायलिसीस नुकतेच झाले आहे, त्यांनी लगेस लस घेऊ नये. अन्यथा त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- डॉ. नितीन भोसले, मूत्रविकार तज्ज्ञ
हृदयविकाराचे रुग्ण हे वयोवृद्ध असतात. रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सुरू असतात. ज्यांना औषधे, गोळ्या, इंजेक्शनची ॲलर्जी असेल त्यांनी लस घेण्याचे टाळावे. हृदयात व्हॉल्व बसविलेल्यांनी रक्ताची चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाची लस घ्यावी.
- डॉ. नितीन पाटील, हृदयरोग तज्ज्ञ
लस घेण्यापूर्वी मधुमेही रुग्णांनी त्यांच्या शरीरातील साखर नियंत्रणात असेल त्यावेळीच लस घ्यावी. लस घेतल्यावर आराम करावा. - डॉ. एस. एन. कुलकर्णी, मधुमेह तज्ज्ञ