डोंबिवलीतील वान्या रावची सुवर्णपदकाला गवसणी
By सचिन सागरे | Published: March 9, 2023 06:37 PM2023-03-09T18:37:31+5:302023-03-09T18:37:57+5:30
डोंबिवलीतील वान्या रावने संयुक्त अरब अमिरती येथील शारजामध्ये सुवर्णपदक जिंकले.
डोंबिवली: संयुक्त अरब अमिरती येथील शारजामध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत डोंबिवलीतील निळजे गावच्या वान्या राव या खेळाडूने भारताकडून खेळताना सुवर्णपदक पटकावत चमकदार कामगिरी केली आहे.
लहानपणापासून वान्याला कराटेमध्ये रुची असल्याने ती कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी देखील वान्याने विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावले आहे. यूएई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या मेगा कराटे स्पर्धेत २० हून अधिक देशांतील एक हजारांपेक्षा जास्त कराटे खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ही चमकदार कामगिरी करण्यासाठी आपल्याला वर्ल्ड कराटे फेडरेशनचे तांत्रिक सदस्य भारत शर्मा, महाराष्ट्र कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सलाउद्दीन अंसारी, सचिव संदीप गडे यांच्यासह १४ वर्षाखालील टीम इंडियाचे कोच अनिकेत गुप्ता या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची प्रतिक्रिया वान्या राव हिने दिली.