पवईत घरकाम करणारी तरुणी वाशीला सापडली, १६ तासांच्या प्रयत्नांनंतर लागला घरच्यांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 05:28 AM2020-12-24T05:28:23+5:302020-12-24T05:29:03+5:30
Vashi Station : मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान वाशी खाडी रेल्वे ब्रीजवर रेल्वे रुळालगत रक्ताच्या थारोळ्यात एक तरुणी बेशुद्ध पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कल्याण : एक २१ वर्षीय तरुणी वाशी ब्रीज रेल्वे रुळाजवळ बेशुद्ध अवस्थेत रेल्वे पोलिसांना आढळली असून, ती १६ तास बेशुद्द होती. बेशुद्ध अवस्थेत तिने केवळ तीनच शब्द पुटपुटले व त्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांनी तिच्या आईवडिलांचा शोध लावला. ती पूर्ण शुद्धीत आल्यावर तिच्यासोबत काय घडले, ती वाशी रेल्वे ब्रीजवर कशी पोहोचली. तिला ठार मारण्याचा प्रयत्न कोणी केला, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान वाशी खाडी रेल्वे ब्रीजवर रेल्वे रुळालगत रक्ताच्या थारोळ्यात एक तरुणी बेशुद्ध पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील तरुणीला तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. थोडी-फार शुद्धीवर आल्यावर तिने तिच्या आईचे व स्वत:चे नाव पुटपुटले. त्याचबरोबर, तिच्या तोंडातून टिटवाळा हा शब्द बाहेर पडला. या तीन शब्दांच्या आधारे रेल्वे पोलिसांना तिचा ठावठिकाणा शोधायचा होता. वाशी रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल त्यांच्या पथकाने संपूर्ण टिटवाळा परिसर पिंजून काढला. १६ तासांनंतर रेल्वे पोलिसांनी तरुणीच्या घरचा पत्ता शोधून काढला.