सामुहिक बलात्कार प्रकरणी ‘त्या’ निर्णयाविरोधात पीडितेने जिल्हा न्यायालयाचे दार ठोठावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 09:03 AM2021-12-17T09:03:53+5:302021-12-17T09:04:18+5:30

आजच्या सुनावणीकडे लागले लक्ष

The victim knocked on the door of the district court against the 'that' decision in the gang rape case | सामुहिक बलात्कार प्रकरणी ‘त्या’ निर्णयाविरोधात पीडितेने जिल्हा न्यायालयाचे दार ठोठावले

सामुहिक बलात्कार प्रकरणी ‘त्या’ निर्णयाविरोधात पीडितेने जिल्हा न्यायालयाचे दार ठोठावले

Next

डोंबिवली: सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार अल्पवयीन आरोपींची भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. परंतू या निर्णयाला पिडीताने आव्हान दिले आहे. जामिन अर्ज रद्द करण्याची मागणी तीने ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. न्यायालयाने मानपाडा पोलिस आणि संबंधित अल्पवयीन आरोपींचे वकिलांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी याबाबतची सुनावणी होणार असून न्यायालयाकडून काय निर्णय दिला जातो याकडे लक्ष लागले आहे.

15 वर्षाच्या मुलीवर तब्बल 33 नराधमांनी नऊ महिन्यांच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना 23 सप्टेंबरला उघडकीस आली होती. राज्यात खळबळ उडवून देणा-या या गुन्हयाचे दोषारोपपत्र कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात मानपाडा पोलिसांकडून सादर झाले आहे. दरम्यान या गुन्हयातील एका आरोपीने जामिनासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार असताना चार अल्पवयीन आरोपींची यापुर्वीच भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. अल्पवयीन आरोपींचे दोषारोपपत्र ३० दिवसात दाखल होणे गरजेचे असते परंतू मानपाडा पोलिसांकडून ते सादर करायला दिड महिना लागल्याने दोघा अल्पवयीन आरोपींना जामिन मंजूर झाला तर अन्य दोघांना आरोप पत्रनंतर जामिन मंजूर करण्यात आला.

दरम्यान चौघांना जामिन देण्याच्या भिवंडी बाल न्यायालयाच्या निर्णयाला पीडितेच्या वतीने ठाणे येथील न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीशांकडे याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. मानपाडा पोलिस आणि संबंधित अल्पवयीन आरोपींचे वकील काय बाजू मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: The victim knocked on the door of the district court against the 'that' decision in the gang rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.