विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनिटांत; नव्या उन्नत मार्गामुळे फुटणार कोंडी 

By मुरलीधर भवार | Published: November 24, 2023 07:28 PM2023-11-24T19:28:07+5:302023-11-24T19:28:47+5:30

सध्याच्या घडीला कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा हा परिसर तसा भौगोलिकदृष्ट्या दूर नाही.

Vitthalwadi to Kalyan Nagar highway travel in just five minutes | विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनिटांत; नव्या उन्नत मार्गामुळे फुटणार कोंडी 

विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनिटांत; नव्या उन्नत मार्गामुळे फुटणार कोंडी 

कल्याण - कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते. हा वळसा येत्या काही दिवसात थांबणार असून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे ४० मिनिटांचा प्रवास वेळ पाच मिनिटांवर येणार आहे. लवकरच या कामाची निविदा जाहीर केली जाणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे.

सध्याच्या घडीला कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातले प्रवासी वाहन चालक भिवंडी, ठाणे आणि मुंबईत जाण्यासाठी कल्याण शहरातून प्रवास करतात. त्यामुळे कल्याण शहराचे प्रवेशद्वार कोंडीत अडकते. यावर उपाय म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनापुढे जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून विठ्ठलवाडी ते थेट कल्याणच्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी उन्नत मार्गाची संकल्पना मांडली होती. एमएमआरडीएने तात्काळ त्याला मंजुरी देत त्याचे सर्वेक्षण करून भूसंपादन सुरू केले. त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार झाला असून त्यासाठी आवश्यक ७० टक्के जागाही संपादित करण्यात आली आहे. आराखड्यानुसार विठ्ठलवाडी स्मशानभूमीच्या शेजारून हा उन्नत मार्ग सुरू होतो. कल्याण कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि पुढे कल्याण कसारा रेल्वे मार्ग ओलांडून वालधुनी नदीला समांतर असा हा उन्नत मार्ग थेट कल्याणच्या अहमदनगर महामार्गाला जोडला जाणार आहे. विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीजवळून हा मार्ग सुरू होऊन कल्याण अहमदनगर महामार्गावर पाल्म वॉटर रेसॉर्ट येथे उतरणार आहे. जवळपास अडीच किलोमीटरचा हा मार्ग कल्याण शहरात होणारी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी ७०० कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात जाणारी वाहतूक परस्पर वळवली जाणार आहे.
 
उन्नत मार्ग महत्वाचा कसा
सध्याच्या घडीला कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसर आणि कल्याण पश्चिम भागात येणारा हा परिसर तसा भौगोलिकदृष्ट्या दूर नाही. मात्र या वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातून प्रवास करत शहाड भागात जाणे तितकेसे सोपे नाही. त्यासाठी थेट मार्ग तर मुळीच नाही. त्यामुळे एकाच शहराची दोन टोके दूर असल्यासारखे वाटतात. जुना कल्याण पुणे लिंक रस्ता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र आता ही कसरत बंद होणार आहे. विठ्ठलवाडी भागातून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी नव्या उड्डाणपुलाची निर्मिती केली जात आहे. कमीत कमी भूसंपादन करत अथडळे टाळत हा मार्ग उभारण्याची संकल्पना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. त्यामुळे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून थेट कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या पूर्व भागात पोहोचणे सोप होणार आहे. त्यामुळे कल्याण आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.

Web Title: Vitthalwadi to Kalyan Nagar highway travel in just five minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.