मतदान विकासाला की सहानुभूतीला? श्रीकांत शिंदे मताधिक्य मिळवणार, की वैशाली दरेकर त्यांचा विक्रम रोखणार
By अनिकेत घमंडी | Published: May 22, 2024 03:42 PM2024-05-22T15:42:02+5:302024-05-22T15:42:40+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ‘अब की बार पाँच लाख पार’, असे जाहीर केले होते, तेव्हापासून शिंदे यांचा प्रचार हा मताधिक्याच्या दिशेने सुरू होता.
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा चार टक्के जास्त म्हणजे ५०.१२ टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी २० लाख ८२ हजार २२१ मतदारांपैकी १० लाख ४३ हजार ६१० मतदारांनी मतदान केल्याचे निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केले. हा वाढलेला टक्का महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पाच लाख मताधिक्याचे स्वप्न साकार करणार की, महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना दिलासा देणार याबाबत उत्सुकता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ‘अब की बार पाँच लाख पार’, असे जाहीर केले होते, तेव्हापासून शिंदे यांचा प्रचार हा मताधिक्याच्या दिशेने सुरू होता. २ मे रोजी अर्ज भरल्यानंतर प्रचाराची दिशा बदलली होती. मात्र, प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी सकाळचा प्रहर वगळता कल्याण पूर्व, मुंब्रा, कळवा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाने वेग घेतला. महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर मतदारसंघांच्या तुलनेत मुंब्रा-कळवा परिसरात झालेले मतदान महायुतीला चिंतेत टाकणारे आहे. डोंबिवली, कल्याण मतदारसंघांत लाखो मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना बूथवर येऊन परतावे लागले, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
कल्याण पूर्व, मुंब्रा व कळवा काही प्रमाणात उल्हासनगर या भागांत जिथे दरेकर मोठ्या प्रमाणात प्रचाराला गेल्या होत्या, तिथून त्यांना मतांची फार अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले, तेथे झालेल्या मतदानामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कळवा मुंब्रा येथून २ लाख १६ हजार १५९, तर कल्याण ग्रामीणमधून २ लाख ३१ हजार १६२ आणि कल्याण पूर्वमधून १ लाख ५६ हजार २३५ मतदारांनी मतदान केले आहे. ही सर्वाधिक मते असून, डोंबिवलीत १ लाख ४२ हजार १४२, उल्हानसगर १ लाख ३१ हजार ५०५, तर अंबरनाथमध्ये १ लाख ६६ हजार ४०७ मतदान झाले.
गोळीबार प्रकरणाचे पडसाद उमटणार?
- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील केलेल्या गोळीबार प्रकरणाचे पडसाद निवडणूक मतदानात उमटतात का, हे पाहावे लागणार आहे.
- तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभेत मुंब्रा-कळवा येथे येऊन परप्रांतीय, मुस्लिमांवर केलेल्या टीकेचा परिणाम महायुतीच्या उमेदवाराच्या मतदानावर कसा होतो, हे निकालाअंती स्पष्ट होईल.
- मागील २०१४ व २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी २ लाख २० हजारांहून अधिक मते घेतली होती. ती मते विभागली गेली किंवा कुणाच्या पारड्यात गेली यावर बरेच काही अवलंबून आहे.