लोकसभा निवडणूक लढवायची का? राज ठाकरेंनी जाणून घेतली पदाधिकाऱ्यांची 'मन की बात'
By प्रशांत माने | Published: February 23, 2024 08:59 PM2024-02-23T20:59:02+5:302024-02-23T21:01:04+5:30
डोंबिवलीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारपासून कल्याण डोंबिवलीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी भिवंडी लोकसभेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. यात पक्ष बांधणीसह लोकसभा निवडणूक लढवायची का? निवडणूक स्वबळावर की युतीमध्ये लढवायची याबाबत चर्चा केली. यावर निवडणूक लढविण्याकडे बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल दिसून आला. शनिवारी ते डोंबिवलीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
लोकसभा निवडणूकीची लवकरच घोषणा होण्याचे संकेत आहेत. सर्वच पक्ष युती आणि आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत असताना मनसेने देखील लोकसभा मतदारसंघांमध्ये चाचपणी सुरु केली आहे. मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांवर राज ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शुक्रवारी ठाकरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष आदि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतची मतं जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, आमदार राजू पाटील आदी नेते बैठकीत उपस्थित होते.
राज ठाकरे कल्याण दौऱ्यावर असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते दुर्गाडी येथे थांबले होते. याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाहनांचा ताफा रस्त्यावरून जात असतानाच मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटले राज ठाकरेच आले आहेत. त्यांनी लागलीच त्यांच्याकडील फटाके फोडण्यास सुरुवात केली मात्र ते राज ठाकरे नसून ते कपिल पाटील असल्याचे समजताच तेथे एकच हशा पिकला आणि फटाके आणण्यासाठी पुन्हा धावपळ उडाली.
पत्रकारांशी भाष्य करणे टाळले
पदाधिका-यांबरोबर बैठक घेऊन झाल्यावर ठाकरे तडक तेथून दुसरीकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी भाष्य करणं टाळले. उद्या ते कल्याण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी डोंबिवलीत बैठक घेणार आहेत. तेथे ठाकरे पत्रकार परिषद घेतील असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.