वंदेमातरम् उद्यानात साकारली वारली चित्रकला, सर्वत्र होतंय कौतुक

By अनिकेत घमंडी | Published: January 25, 2023 12:49 PM2023-01-25T12:49:03+5:302023-01-25T12:49:43+5:30

वीणा देशमुख यांनी काढली चित्रे, बँकेमधून निवृत्त झाल्यावर जोपासली आवडला छंद

Warli painting executed in Vandemataram park is appreciated everywhere | वंदेमातरम् उद्यानात साकारली वारली चित्रकला, सर्वत्र होतंय कौतुक

वंदेमातरम् उद्यानात साकारली वारली चित्रकला, सर्वत्र होतंय कौतुक

googlenewsNext

अनिकेत घमंडी, डोंबिवली: एमआयडीसी मिलापनगर मधील वंदेमातरम् उद्यानात खडकावर लक्षवेधी वारली पेंटिंग चित्रकला साकारण्यात आली आहे. ही आदिवासी प्रकारातील वारली चित्रकला एक वरिष्ठ नागरिक महिला वीणा देशमुख  यांनी काढली आहे. बँकेमधून निवृत्त झाल्यावर मोकळा वेळ मिळाल्याने त्यांनी खास ही वारली चित्रकला शिकून आत्मसात केली. ही वारली चित्रकला ही जेथे चांगली जागा मिळेल तेथे काढण्याचे देशमुख यांनी एक ध्यास घेतला असून वंदेमातरम् उद्यानात अनेक मोठे खडक बघून त्यांवर तेथे वारली पेंटिंग करण्याचे त्यांचा मनात भरले.

त्यांनी तशी वंदेमातरम् उद्यानाची व्यवस्था बघणाऱ्या मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन कडे परवानगी घेऊन गेल्या चार दिवसांपासून रोज सकाळी दोन तास येऊन स्वखर्चाने खडकावर रंगकाम करून वारली चित्रकला त्या काढत आहेत.  आज माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी वारली, आदिवासी गावातील पद्धतीचे एक गणेश मंदिराचे चित्र खडकावर साकारून त्यांनी माघी श्री गणेश जयंती एक प्रकारे साजरी केली. याच उद्यानात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी झेंडावंदन कार्यक्रम करण्यात येतो. त्यानिमित्त आपल्या भारतीय संस्कृतीचे वारली चित्रकलेचे दर्शन सर्वांना मिळणार आहे.

वंदेमातरम् उद्यान हे मिलापनगर मधील सर्व्हिस रोडच्या बाजूला हायटेन्शन वायरच्या खाली एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर वसले असून त्यात फार पूर्वीपासून मोठे खडक, झाडी झुडपे होती. हे मोठे काळे खडक या हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या उद्यानात  काहीसे दिसायला वेगळे वाटत होते. आता त्यावर वारली पेंटिंग केल्याने या उद्यानाला एक मोहक रूप प्राप्त झाले आहे. याच उद्यानात जॉगिंग ट्रॅक असल्याने आता अनेक नागरिक वनराईने नटलेल्या या उद्यानात फिरताना त्यांना वारली चित्रकला बघण्यास एक वेगळा आनंद मिळणार आहे. दुसरे एक विशेष म्हणजे याच उद्यानात झाडांचा पडलेला पालापाचोळा/फुले यापासून खत निर्मितीचा एक छोटा प्रकल्प नुकताच उभारण्यास आला आहे.

देशमुख यांनी सदर उद्यानात वारली चित्रकला काढण्यास घेतल्या पासून निवासी परिसरातील सकाळी चालण्यास येणाऱ्या काही भगिनींनी त्यांना मदत करण्याचे ठरविले. रेखा तांबट,  रुपाली प्रभुदेसाई, वर्षा महाडिक, अश्विनी तळवेलकर इत्यादी महिलांनी सदर चित्रकला साकारण्यास योगदान दिले आहे.

Web Title: Warli painting executed in Vandemataram park is appreciated everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.