कल्याणमध्ये येणार युद्धनौका, पालिकेकडे सुपूर्द; दोन दिवसांत दुर्गाडी येथे होणार आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 03:54 PM2023-02-05T15:54:27+5:302023-02-05T15:56:05+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारत आहे. त्यासाठी टी-८० युद्ध ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी खाडीकिनारी नौदल संग्रहालय उभारत आहे. त्यासाठी टी-८० युद्ध नौका महापालिकेस देण्याचा सामंजस्य करार नौदलाकडून यापूर्वीच झाला आहे. ही युद्ध नौका शनिवारी कुलाबा डॉक यार्ड येथे महापालिकेच्या हाती सुपूर्द करण्यात आली. येत्या दोन दिवसांत या युद्ध नौकेचे आगमन दुर्गाडी खाडीकिनारी होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीच्या साक्षीने मराठा आरमाराची स्थापना दुर्गाडी खाडी किनारी केली होती. मराठा आरमाराचे स्मारक उभे करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नौदलाचे संग्रहालय उभे राहणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून टी-८० युद्ध नौका उभी केली जाणार आहे. भारतीय नौदलाचा महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीसोबत नोव्हेंबर महिन्यात सामंजस्य करार झाला होता. शनिवारी कुलाबा येथील डॉक यार्ड येथे टी-८० युद्ध नौका महापालिकेस सुपूर्द करण्यात आली.
नौदल, केडीएमसी अधिकाऱ्यांची उपस्थिती
याप्रसंगी महाराष्ट्र नौदल रिअल ॲडमिरल ए. ए. प्रमोद, कमांडर जिलेट कोशी, महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, डॉ. विजय सूर्यवंशी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा आदी मान्यवर उपस्थित होते.
भावी पिढीसाठी प्रेरणादायी स्मारक
आयुक्त दांगडे यांनी सांगितले की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. माजी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले की, नौदल संग्रहालयास मराठा आरमार स्मारकात युद्धनौका जतन करण्याची संकल्पना मी मांडली. ती प्रत्यक्षात साकार होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. टी-८० या युद्ध नौकेमुळे कल्याणमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पुढील पिढ्यांसाठी प्रथमच या युद्ध नौकेच्या स्वरूपात एक प्रेरणादायी स्मारक किल्ले दुर्गाडी येथे उभारले जाणार आहे.