कल्याणमधील नववसाहतींत पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:20 AM2020-12-28T00:20:42+5:302020-12-28T00:20:53+5:30
मुरलीधर भवार कल्याण : पश्चिमेतील गौरीपाडा गावानजीक उल्हास नदीला लागून असलेल्या परिसरात मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. याच परिसरात ...
मुरलीधर भवार
कल्याण : पश्चिमेतील गौरीपाडा गावानजीक उल्हास नदीला लागून असलेल्या परिसरात मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. याच परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीटी पार्क उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात या परिसराला चांगला भाव येणार आहे. तसेच त्याला चांगला लूक मिळणार आहे. परंतु, सध्या या गृहसंकुलांपर्यंत जाण्यासाठी रस्ते असले तरी पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. त्याचबरोबर काही मूलभूत सोयीसुविधांचा अभावही आहे.
ऐतिहासिक कल्याण शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. खडकपाडा, गांधारी, गौरीपाडा आदी परिसरात लोकवस्ती वाढत आहे. तेथे मोठी गृहसंकुले आकारास येत आहेत. नव्या वस्तींच्या विकासाच्या दृष्टीने तसेच नागरी सोयीसुविधांच्या हालचाली केडीएमसीकडून कासव गतीने सुरू आहेत. नव्या लोकवस्तीमुळे या परिसरातील अन्य गोष्टींना चालना मिळणार आहे. याच परिसराला लागून असलेल्या चाळवजा घरात राहणाऱ्या नागरिकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या नववसाहतींना महापालिकेकडून योग्य प्रकारे सोयीसुविधा मिळणार की नाहीत, असा सवाल या परिसरात राहणारे नागरिक उपस्थित करत आहेत.