...म्हणून कमी पाऊस पडूनही कल्याण डोंबिवली गेली पाण्याखाली; समोर आलं महत्त्वाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 05:24 PM2021-07-22T17:24:23+5:302021-07-22T17:28:23+5:30
शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यानं अफवांचं पीक
- मयुरी चव्हाण
कल्याण: कल्याणडोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बहुसंख्य परिसरात पावसाचे पाणी शिरून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र गुरुवारी कल्याण डोंबिवली परिसराचे जनजीवन विस्कळीत झालेलेपाहायला मिळाले. विशेष बाब म्हणजे या गुरुवारी पावसाचा जोर कमी असला तरी शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. पाणी साचत असल्याने अफवांचे पीकदेखील आले होते. मात्र भरतीमुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि हे पाणी शहरात शिरल्याचे दिसून आले आणि गुरुवारी पावसाने काहीशी विश्रांती घेऊनही भरतीमुळे पाण्याच्या पातळीत झालेली वाढ आणि त्यासोबत आलेली भरती यामुळे कल्याण डोंबिवली शहर पाण्याखाली गेले.
गुरुवारी सकाळपासून कल्याण पूर्व परिसर, डोंबिवलीतील देवीचा पाडा, कुंभारखाणपाडा, एमआयडीसी, टिटवाळा, शहाड, ठाकुर्ली या परिसरात पाणी साचले होते. चाळी व गृहसंकुल पाण्याखाली गेली होती. गुरुवारी मुसळधार पाऊस झाला नाही तरीही पाणी का साचतय असा सवाल निर्माण झाला होता. यातच गेले काही दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणाचे दरवाजे उघडले गेले असल्याची व त्यामुळे शहरात पूरस्थिती गंभीर होणार अशी अफवा सर्वत्र पसरली होती. जो तो प्रत्येकाला ही माहिती देऊन भीतीचे वातावरण निर्माण करत होता. अखेर ही अफवा असून बारवी धरण अद्याप पूर्ण भरले नाही असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. गुरुवारी पावणे एक ते तीन ही वेळ भरतीची होती. कल्याण डोंबिवली शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे वालधुनी , उल्हास नदी ,काळू नदी देखील शहाराला लागून आहेत. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आधीच नदी, खाडीकिना-यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. त्यात गुरुवारी भरती असल्याने सुमारे 4. 7 मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हे पाणी हळूहळू शहरात शिरले अन जनजीवन विस्कळित झाले.