५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 06:50 PM2021-08-05T18:50:23+5:302021-08-05T18:52:10+5:30
मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे
डोंबिवली : आठ महिन्यांपासून एमआयडीसीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची जलवाहनी टाकण्याचे काम सुरू असून ते कूर्मगतीने सुरू असल्याने उच्चभ्रू रिजन्सी गृहसंकुलातील रिजन्सी इस्टेट को ऑप. हौसिंग सोसायटीमधील ५ हजार रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्रस्त रहिवाशांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून काहिही फायदा न झाल्याने गुरुवारी एमआयडीसीवर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. त्या रहिवाशांचे प्रतिनिधी, सोसायटीचे अध्यक्ष हर्षल हंचाटे, सचिव चंद्रहास चौधरी, वर्किंग कमिटी सदस्य सचिन म्हात्रे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. उरलेले सुमारे साडेचार लाख लिटर पाणी आम्ही ८ महिने ४८ टँकर रोजच्या रोज मागवून गरज भागवत आहोत. एवढी महिने काम सुरू असून अद्याप ते पूर्ण झालेले नाही. ३० जून अखेरीस त्या कामाची डेडलाईन होती, परंतु कोणीही अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या तीव्र झाली असून आबालवृद्ध हैराण झाले आहेत. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांनी स्वत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून गुरुवारी आंदोलन करण्यात आल्याचे चौधरी म्हणाले. ४८ टँकर मागवण्यासाठी ८० हजार रुपये रोजचा खर्च असून तो उभा करताना नाकी नऊ आले असून समस्या सुटण्याची चिन्ह दिसत नसल्याने नागरिक संतापले आहेत.
नेमके ते काम कधी संपणार आणि निवासी, कंपन्यांसाठी स्वतंत्र जलवाहिनी असे साचेबद्ध काम होणार आहे का? तसेच आतापर्यंत प्रतिदिन झालेला ८० हजार रुपये खर्च आणि त्यासोबतच साडेचार लाख लिटर पाणी कमी मिळत असल्याने या सर्व बाबींचा विचार करुन एमआयडीसीने गृहसंकुलातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पाणी नाही, टँकर नाही, कर तर वसूल होणारच मग त्याचा त्रास नागरिकांना का? पदरमोड करून पैसे उभा करायचा आणि त्यातून मानसिक त्रास घ्यायचा हे कोणी सांगितलं, असा सवालदेखील गृहिणींनी केला. समस्या संदर्भात पत्र पाठवून देखील अधिकारी जागेवर येत नाहीत समस्या सुटेल तरी कशी? आंधळ दळत....अशी स्थिती झाली असून त्याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. समस्या सोडवण हे यंत्रणाच काम आहे, त्या सुटल्याच पाहिजेत अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेत एमआयडीसीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
रहिवासी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी त्यापैकी काही नागरिकांना कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी बोलावले.पाटील यांनी समस्या समजावून घेत दोन दिवसात अधिकारी पाठवून ती समस्या मार्गी लावण्यासाठी हालचाल।करण्यात येईल असे सांगितले. तसेच पाटील यांनी शुक्रवारी त्या पदाचा पदभार घेतला असल्याने त्यांना नेमक्या सुरू असलेल्या कामाबाबत तसेच येथील समस्यांबाबत माहिती घेऊन कार्यवाही करायला काहीसा अवधी लागेल हे सामाजिक बांधिलकी म्हणून समजून घेत असल्याचे त्यावेळी रहिवाश्यांनी स्पष्ट केले.परंतु समस्या न सुटल्यास मात्र निषेधाचे स्वरूप तीव्र असेल असेही सांगण्यात आले. तसेच जलवाहिनी नव्याने टाकताना रहिवासी आणि परिसरातील कंपन्या यांचे स्वतंत्र जलवाहिनी असायला हवीत, सध्याचा पाणी तुटवडा कसा सोडवायचा, टँकर कोणी पाठवायचे याबाबत निर्णय व्हावा आदी मागण्या रहिवाशांनी केल्या. त्यावर निश्चित तोडगा काढला जाईल असे अश्वासन मिळाल्यानंतर नागरिक माघारी फिरले.