कल्याण पश्चिमेतील गौरी पाड्यात पाणी टंचाई, मनसेचा हंडा मोर्चा; अधिकाऱ्याना दिले गाजर आणि फेअर अँड लवली
By मुरलीधर भवार | Published: July 16, 2024 07:03 PM2024-07-16T19:03:32+5:302024-07-16T19:04:03+5:30
कल्याण पश्चिमेतील अ प्रभाग कार्यालयांतर्गत आटाळी आंबिवली, मोहने परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने गेल्याच महिन्यात शिंदे सेनेच्या वतीने अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
कल्याण-कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात नागरीकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. संतप्त नागरीकांनी मनसेच्या पुढाकाराने कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. अधिकाऱ्या समोर मडके फाेडून प्रशासनाचा जाहिर निषेध केला. यावेळी मनसेच्या वतीने अधिकाऱ्यांना गाजर आणि फेअर अँड लवली भेट देण्यात आली.
कल्याण पश्चिमेतील अ प्रभाग कार्यालयांतर्गत आटाळी आंबिवली, मोहने परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याने गेल्याच महिन्यात शिंदे सेनेच्या वतीने अ प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्या पाठोपाठ ब प्रभाग कार्यालयांतर्गत येणाऱ््या गौरी पाडा परिसरातील नागरीकांनाही पाण्याची समस्या भेडसावत असल्याने मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, उपाध्यक्षा उर्मिला तांबे आणि माजी नगरसेविका कस्तूरी देसाई यांनी ब प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या वेळी संतप्त महिलांनी महापलिकेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाध्यक्ष भोईर यांनी सांगितले की, गौरीपाडा येथील जागा त्याठिकाणच्या जागा मालकांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गंत उभारलेल्या सिटी पार्कसाठी देण्यात आली आहे. शेजारी भव्य सिटी पार्क आहे. मात्र या भागातील नागरीकांना पाणी मिळत नाही. ही आहे का महापालिकेची स्मार्ट सिटी असा संतप्त सवाल उपस्थित केला. अधिकारी बाहेर जात नाही. त्यांनी एसीत बसून काम करुन अधिक गोरे होण्याकरीता त्यांना फेअर अँड लवली आणि गाजर भेट दिले.
यावेळी अभियंता महेश डावरे यांनी येत्या आठवडाभरात गौरी पाडा परिसरातील पाणी समस्या सोडविण्याचे लेखी अश्वासन मनसेला दिले आहे. आठवडाभरात समस्या सुटली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा भोईर यांनी प्रशासनाला दिला आहे.