नागरिकांच्या घरात पाणीच-पाणी, अर्ध्या तासाच्या पावसांतच उद्भवते समस्या
By ओमकार संकपाळ | Published: July 7, 2022 05:06 PM2022-07-07T17:06:19+5:302022-07-07T17:07:17+5:30
पाण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली
कल्याण - कल्याण मलंग रस्त्याच्या लगत असलेल्या द्वारली गावानजीक उभारण्यात आलेल्या इमारतीमुळे नैसर्गिक नाल्याचे प्रवाह खुंटले आहेत. त्यामुळे अर्धा तास जरी पाऊस पडला तरी द्वारली गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. घरात पाणी शिरल्यावर नागरीकांना बाहेरच आसरा घ्यावा लागतो. या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी घाव घेऊन ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी प्रभाग अधिकारीही उपस्थित होते.
पाण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. प्रदेश सचिव केणे यांनी सांगितले की, द्वारली गावातील नागरीकांना पावसाळ्य़ात हा त्रस सहन करावा लागतो. त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरते. पावसाचे घाण पाणी घरात शिरल्याने घरातील वस्तू खराब होता. या ठिकाणी नैस्सर्गिक प्रवाह बांधकामांमुळे खुंटले आहे. त्यावर प्रशासनाने तोडगा काढून नागरीकांची समस्या सोडविण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.
सर्वपक्षीय युवा मोर्चाचे गजानन पाटील यांनी सांगितले की, 27 गावातील दिवा संदप आणि उसरघर याठिकाणी अशा प्रकारचे एका बिल्डरकडून रस्ता आडविला गेला होता. तशाच स्वरुपाची द्वारली या गावातील समस्या आहे. त्यावर प्रशासनाकडून तोडगा काढला जावा. पदाधिकारी भाऊ पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला की, द्वारलीतील नागरीकांच्या घरात पावसाळ्य़ात पाणी शिरण्याची समस्या 2018 पासून सतावित आहे. अर्धा तासाचा पाऊस पडला तरी या लोकांना रस्त्यावर येऊन पाणी ओसण्याची वाट पाहावी लागते. या प्रश्नाकडे प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली जाते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, प्रभाग अधिकारी संजय साबळे हे देखील आजच्या पाहणी प्रसंगी उपस्थित होते. नैसर्गिक प्रवाह खुटला आहे. त्याठिकाणी कार्यवाही करण्यासाठी आल्यावर नागरीकांकडून विरोध केला जातो. त्यांच्याकडून सहकार्य मिळाल्यास यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले.