कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 04:55 PM2021-11-04T16:55:56+5:302021-11-04T16:56:52+5:30
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, स्मारक समितीसह शिवसेना रिपाईचा जल्लोष
कल्याण-कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग समितीच्या कार्यालयानजीक असलेल्या उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. खासदारांच्या प्रयत्नाने हा मार्ग मोकळा झाल्याने स्मारक समितीसह शिवसेना आणि रिपाईच्या कार्यकत्र्यानी आज सकाळी स्मारकाच्या नियोजीत जागेच्या ठिकाणी जल्लोष साजरा केला.
स्मारकासाठी ड प्रभाग क्षेत्रनजीक जागा निश्चीत करण्यात आली होती. त्याठिकाणी आठ चौरस मीटर जागे 1300 चौरस देण्यात आली होती. त्या जागेवर आरक्षण होते. हे आरक्षण बदल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार शिंदे यांनी पाठपुरावा केला. जागेच्या आरक्षणात बदल करण्यात आला आहे. आरक्षणाची जागा निश्चीत होण्यापूर्वीच स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. स्मारकासाठी आणखीन काही निधी लागल्यास तो कमी पडून दिला जाणार तोही उपलब्ध करुन दिला जाईल. स्मारकाच्या कामासाचा सविस्तर अहवाल तयार करुन त्याची निविदा लवकरच काढून कामाला सुरुवात केली जाईल अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.
रिपाई आणि शिवसेनेकडून जल्लोष
कल्याण पूर्व भागात आंबेडकर अनुयायांची संख्या मोठी आहे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महापरिवाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी कल्याण पश्चिमेला यावे लागत होते. दिवाळीच्या तोंडावर आंबेडकर अनुयायांना खासदारांनी ही अनोखी भेट दिली. रिपाई आणि शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी स्मारकाच्या नियोजीत जागेच्या ठिकाणी जल्लोष साजरा केला. यावेळी रिपाईचे नेते अण्णा रोकडे, शिवसेनेचे रमेश जाधव, महेश गायकवाड, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे आदी उपस्थित होते.