"आम्ही शरद पवार यांच्यासोबत", उल्हासनगरात ओमी कलानींचे घुमजाव चर्चेत

By सदानंद नाईक | Published: July 23, 2024 08:55 PM2024-07-23T20:55:51+5:302024-07-23T20:56:34+5:30

लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाने महाविकास आघाडी सोबत जाणे टाळून महायुतीचे उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोस्तीच्या नावाखाली सक्रिय पाठिंबा दिला. 

"We are with Sharad Pawar", Omie Kalani's ghumjaav in Ulhasnagar | "आम्ही शरद पवार यांच्यासोबत", उल्हासनगरात ओमी कलानींचे घुमजाव चर्चेत

"आम्ही शरद पवार यांच्यासोबत", उल्हासनगरात ओमी कलानींचे घुमजाव चर्चेत

उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीत दोस्तीच्या नावाखाली कलानी कुटुंबाने महायुतीचे उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला. मात्र आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत असल्याची भूमिका ओमी कलानी यांनी घेतल्याने, कलानी कुटुंबाच्या घुमजाव भूमिकेची चर्चा शहरात रंगली आहे. 

उल्हासनगरचे राजकारण माजी आमदार पप्पू कलानी यांच्या भोवती गेली चार दशके फिरत आहे. पप्पू कलानी यांनी नगरपालिकेत नगराध्यक्षसह अन्य पदे उपभोगल्यावर सलग चार वेळा आमदार पदी निवडून आले. ४ पैकी २ वेळा ते जेलमध्ये असताना आमदारपदी निवडून आल्याने, त्यांचा डंका सर्वत्र गाजला. त्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी ज्योती कलानी ह्या राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असताना आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी स्थायी समिती सभापतीसह महापौर पद उपभोगले आहे. 

तसेच सुनबाई पंचम कलानी ह्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष असून त्या भाजपच्या मदतीने यापूर्वी महापौर पदी निवडून आल्या. तर आता ओमी कलानी यांनी स्वतः उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातून आमदार पदाचे उमेदवार म्हणून नावाची घोषणा केली. माजी आमदार पप्पू कलानी यांची जेष्ठ नेते शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे. तर सुनबाई पंचम कलानी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहर जिल्हाध्यक्षा आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाने महाविकास आघाडी सोबत जाणे टाळून महायुतीचे उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोस्तीच्या नावाखाली सक्रिय पाठिंबा दिला. 

त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यांनी आक्षेप घेतला नाही. दरम्यान विधानसभेचे पडघम वाजू लागल्याने, युवानेते ओमी कलानी यांनी पंचम कलानी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगून आम्ही शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याची कबुली पत्रकारांसोबत बोलतांना दिली. तसेच आमदार पदाच्या उमेदवारीवर हक्क सांगून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अथवा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. ओमी कलानी यांच्या या भूमिकेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

शिंदे दोस्ती निभावणार का? 
कलानी कुटुंबाने राजकीय वस्त्र बाजूला सारून महायुतीचे उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचा प्रचार केला. मात्र विधानसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे दोस्ती निभावणार का? याचीच चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: "We are with Sharad Pawar", Omie Kalani's ghumjaav in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.