आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, त्यांचा आदेश शिरसावंद्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 09:04 AM2022-06-27T09:04:16+5:302022-06-27T09:04:42+5:30
कल्याण तालुका, कल्याण ग्रामीण शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांची शनिवारी डोंबिवलीनजीकच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील सागाव येथील शिवसेनेच्या शाखेत विशेष बैठक झाली.
डोंबिवली : एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ डोंबिवली शहरातील मुख्य चौकांमध्ये लागलेले बॅनर बहुतांश ठिकाणी उतरवले गेले लागले असताना डोंबिवलीनजीकच्या कल्याण ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी मात्र मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच असून, साहेब जो आदेश देतील तो आम्हाला शिरसावंद्य आहे, असा ठराव शनिवारच्या पार पडलेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
कल्याण तालुका, कल्याण ग्रामीण शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांची शनिवारी डोंबिवलीनजीकच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील सागाव येथील शिवसेनेच्या शाखेत विशेष बैठक झाली. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक एकनाथ पाटील, कल्याण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, तालुका उपप्रमुख बंडू पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, भगवान पाटील, मुकेश पाटील, सुखदेव पाटील यांच्यासह तालुक्यातील भोपर, सागाव, नांदिवली, सोनारपाडा यासह अन्य भागांतील सेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, गटप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत उपस्थितांकडून एक ठराव संमत करण्यात आला. आम्ही सर्व ठाकरे यांच्यासोबत सोबत आहोत. यापुढे ठाकरे जे आदेश देतील ते आदेश पूर्ण करण्यासाठी काम करू, असा निर्णय यावेळी घेतल्याची माहिती कल्याण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी दिली.
सेना महिला आघाडीही ठाकरेंच्या समर्थनार्थ
‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. डोंबिवलीचे तमाम शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना त्यांच्याबरोबर आहे. शिवसेना काल ही होती, आज ही आहे आणि उद्याही राहणार,’ अशी प्रतिक्रिया महिला आघाडीतर्फे देण्यात आली. शनिवारी रात्री डोंबिवली शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात महिला आघाडीची बैठक झाली. यावेळी किरण मोंडकर, कविता गावंड, वैशाली दरेकर-राणे, मंगला सुळे, ममता घाडीगावकर यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्या उपस्थित होत्या.