संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही : श्रीकांत शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 10:56 AM2022-12-19T10:56:37+5:302022-12-19T10:57:03+5:30
आम्हाला लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे, ते बघून काहींमध्ये आता तडफड होत असल्याचे शिंदे यांचे वक्तव्य.
कल्याण : आम्हाला लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे, ते बघून काहींमध्ये आता तडफड, फडफड, मळमळ वाढू लागली आहे, असा टोला कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार संजय राऊतांना लगावला. ते काय बोलतात त्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि त्यावर उत्तर देणे आम्हाला गांभीर्य वाटत नाही, असेही शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर सीएम, अशी टीका राऊत यांनी केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी हा टोला लगावला. आम्हाला पत्रकारांनी रोजरोज तेच-तेच प्रश्न तुम्हीही विचारू नयेत. आम्हाला विकासाविषयी काही असेल तर ते नक्की विचारा, त्याची सगळी उत्तरे आम्ही देऊ, असेही शिंदे म्हणाले. कल्याण पूर्व व कल्याण ग्रामीण भागातील विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यासाठी रविवारी शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, आणखी काही आमदार संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. याबाबतही शिंदे यांनी रोजच अनेक आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ज्या प्रकारे सरकार काम करतंय, ते पाहून येणाऱ्या काळात अनेक आमदार, लोकप्रतिनिधी संपर्कात आहेत.
नवीन वर्षाला काही दिवस बाकी आहेत. तेवढी वाट आपल्याला पाहावी लागेल, असे ते म्हणाले. तर राऊत हे वास्तुशास्त्रातील ज्योतिष नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे जनतेने पाहू नये. आज शिंदे सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, ते जोरात चालू आहे. ते शेवटपर्यंत टिकेल आणि पुढेही पाच वर्षे टिकेल, असे आमदार गणपत गायकवाड म्हणाले.