आम्ही गांधीचे वारसदार, कायदा हातात घेणार नाही, पण...; जितेंद्र आव्हाडांचा इशारा
By अनिकेत घमंडी | Published: October 4, 2022 01:31 PM2022-10-04T13:31:10+5:302022-10-04T13:31:27+5:30
पोलिसी वापर, गुंड लोकांना राजाश्रय नसावा हे नेत्यांनी लक्षात घ्यावे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
डोंबिवली - हिटलर जनतेच्या रेट्यापुढे टिकू शकला नाही. हा अतिरेक ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. आम्ही गांधीचे वारसदार आहोत. कायदा हातात घेणार नाही पण अहिंसक आंदोलन करून उभे राहू. जनआंदोलन चिरडता येत नाही. ही वैचारिक लढाई आहे. अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही हे लक्षात घ्यावं असा इशारा माजी मंत्री राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पोलिसी वापर, गुंड लोकांना राजाश्रय नसावा हे नेत्यांनी लक्षात घ्यावे, एक माणूस क्रांती घडवतो हे लक्षात घ्यावे. सत्ता बदल आवर्जून होतो. शहरातील कायदा सुव्यवस्था कोलमडली असून ते योग्य नाही, भाजपचा कार्यकर्ता कसा असतो ही राजकीय दहशत या ठिकाणी दिसून येत असल्याचं आव्हाडांनी म्हटलं.
डोंबिवलीकरांच्या सहनशिलतेला माझा मानाचा मुजरा
लोक मतदान कसं करतात, सुसंस्कृत शहर, विद्येच माहेर घर, स्मार्ट सिटी, सर्वगुणसंपन्न अस हे शहर आहे का? एक रस्ता दाखवा जिथे खड्डा नाही, वाईट जनतेच वाटतं, मत कोणत्या आधारावर देतात, कोणता सोन्याचा पत्रा इथं लावला आहे असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित करत डोंबिवलीकरांच्या सहनशिलतेला माझा मानाचा मुजरा असल्याचं खोचक विधान जितेंद्र आव्हाडांनी केले.
काय आहे प्रकरण?
कल्याण ग्रामीण मतदारसंघात संदप गावात राहणारे प्रल्हाद पाटील यांनी दिवा वसई मार्गावर ट्रेन खाली आत्महत्या केली, त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता, तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्यवसायात त्यांना काही जणांनी त्रास दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणी भाजप कार्यकर्ते माळी यांच्यासह पंधरा जणांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, माजी आमदार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने डीसीपी सचिन गुंजाळ यांची भेट घेत माळी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तर संदप येथील व्यावसायिक प्रल्हाद म्हात्रे यांच्या आत्महत्या प्रकरणात नाहक भाजप कार्यकर्ते संदीप माळी यांना गुंतवलं जात आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दबावतंत्रचे राजकारण केलं जात असून तपास यंत्रणेने निःपक्षपातीपणे चौकशी करावी, त्यापूर्वीच नाहक भाजपच्या पदाधिकाऱ्याला बदनाम करु नका, राष्ट्रवादीची तशी भूमिका सगळ्यांना माहिती आहे अशी टीका कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती.