कल्याणमध्ये ‘दीप प्रज्वलन’ करून ‘श्रावण’ मासाचे स्वागत
By सचिन सागरे | Published: July 17, 2023 04:40 PM2023-07-17T16:40:47+5:302023-07-17T16:41:39+5:30
शाळेतील विद्यार्थ्यांनी घरून विविध आकाराच्या, बहुरंगी पणत्या आणल्या होत्या. भव्य अशी दीपमाळ, लामण दिवा, कंदील, चिमणी तसेच जुन्या काळातील दिवेही या अमावस्येच्यानिमित्त प्रज्वलित करण्यात आले.
कल्याण : आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावास्येचे औचित्य साधून पश्चिमेकडील बालक मंदिर पूर्व प्राथमिक व प्राथमिक इंग्लिश माध्यमाच्या शाळेने आपली परंपरा जपत ‘दीपोत्सव’ मोठ्या दिमाखात साजरा केला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून विविध आकाराच्या, बहुरंगी पणत्या आणल्या होत्या. भव्य अशी दीपमाळ, लामण दिवा, कंदील, चिमणी तसेच जुन्या काळातील दिवेही या अमावस्येच्यानिमित्त प्रज्वलित करण्यात आले. फुलांची सुबक रांगोळी काढून श्रावण मासाचे स्वागत करण्यात आले. सारा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने प्रज्वलित झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षाची सांगता करताना देशाच्या महान नेत्यांच्या स्मृतींची आठवण ठेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
दीपप्रज्वलनाचे उद्घाटन स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष बजरंग तांगडकर व शांताराम तांगडकर यांनी केले. सदर कार्यक्रमास संस्था कार्यवाह डॉ. सुश्रुत वैद्य, प्राथमिक शाळेचे अध्यक्ष रमेश गोरे, प्रसाद मराठे, अनिल कुलकर्णी, मुग्धा केळकर, तेजस्विनी पाठक, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कामिनी पाटील तसेच पाहुण्याची ओळख भालचंद्र घाटे यांनी तर आभार प्रकाश पानसरे यांनी मानले. तसेच, कर्णिक रोड येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत दीप अमावस्येचे आयोजन केले होते. दीप अमावस्यानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावले व त्या दिव्यांची माहिती व गोष्ट विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.