दोघा तडीपार गुंडांच्या कल्याण गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
By सचिन सागरे | Published: December 23, 2023 06:52 PM2023-12-23T18:52:39+5:302023-12-23T18:52:55+5:30
माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुंजाळला ताब्यात घेतले.
डोंबिवली: घातक चॉपर बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन दहशत पसरविणाऱ्या तडीपार सराईत गुंड व एक तडीपार अशा दोघा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात कल्याण गुन्हे शाखेस यश आले आहे. आतिष राजु गुंजाळ (२४) आणि गणेश अशोक अहिरे (२२, दोघे रा. शेलारनाका, डोंबिवली) अशी दोघांनी नावे आहेत. या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ठाकुर्ली रोड या ठिकाणी हातामध्ये चॉपर घेऊन सराईत गुंड गुंजाळ परिसरात दहशत निर्माण करत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुंजाळला ताब्यात घेतले. अपहरण, घातक शस्त्रजवळ बाळगून गंभीर दुखापत करणे, अमलीपदार्थ विक्री करणे अशाप्रकारचे यापूर्वी पाच गुन्हे रामनगर पोलीस ठाण्यात गुंजाळविरोधात दाखल आहेत. डोंबिवली येथील जिमखाना परिसरात सायंकाळी ८ च्या सुमारास वावरणाऱ्या तडीपार गुंड अहिरे याला कल्याण गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्यावर डोंबिवली व टिळकनगर पोलीस ठाण्यात चोरी, घातक शस्त्र जवळ बाळगणे, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहायक पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय माळी, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, बापुराव जाधव, बालाजी शिंदे, रविंद्र लांडगे, किशोर पाटील, सचिन वानखेडे, अनुप कामत, विनोद चन्ने यांनी केली.