कल्याणच्या आमदारांनी अधिवेशनात नेमकी काय मागणी केली?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 11:38 AM2024-07-05T11:38:54+5:302024-07-05T11:39:34+5:30
ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात पूर्वीपासूनच मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजाचे वास्तव्य आहे.
कल्याण - ठाणे, रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना भोईर यांनी ही मागणी केली आहे.
ठाणे, रायगड आणि मुंबई परिसरात पूर्वीपासूनच मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजाचे वास्तव्य आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध विकासकामे आणि विकास प्रकल्पासाठी शासनाकडून त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र या जमिनींअभावी आगरी कोळी समाजासमोर उत्पन्नाच्या साधनाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे विश्वनाथ भोईर यांनी सभागृहात सांगितले. या पार्श्वभूमीवर इतर सामाजिक महामंडळांच्या धर्तीवर आगरी कोळी समाजासाठी विशेष असे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यासाठी अर्थसहाय्य करण्याची आग्रही भूमिका त्यांनी अधिवेशनात मांडली आहे.
म्हणून हवे आहे हे आर्थिक विकास महामंडळ...
विद्यमान महायुती सरकारने आताच्या काळात विविध समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली आहेत. त्या धर्तीवर आगरी कोळी समाज बांधवांसाठीही आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. जेणेकरून प्रकल्पासाठी शेतजमीन गेलेल्या, शेतजमीन नसल्याने उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न, महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, भागीदारी पद्धतीने संविधानिक संस्थांसह अभियांत्रिकी, कृषी आदी व्यावसायिक संस्था स्थापन करून त्यासाठी हे आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे आवश्यक असल्याची गरज आमदार विश्वनाथ भोईर यांनी या अधिवेशनात अधोरेखित केली आहे.