भाजपाच नेमकं चाललयं तरी काय? दुसऱ्यांदा घेतला निर्णयावरून 'यु'टर्न; कुणाची मैत्री आली आड?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 06:11 PM2022-01-28T18:11:58+5:302022-01-28T18:12:14+5:30

मोठा गाजावाजा करत भाजपाने पत्रकार परिषद घेत अपर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत  मोर्चा स्थगित केल्याची माहिती भाजपकडून घेण्यात आली.

What exactly is BJP doing? 'U' turn from the second decision taken; Whose friendship came first? | भाजपाच नेमकं चाललयं तरी काय? दुसऱ्यांदा घेतला निर्णयावरून 'यु'टर्न; कुणाची मैत्री आली आड?

भाजपाच नेमकं चाललयं तरी काय? दुसऱ्यांदा घेतला निर्णयावरून 'यु'टर्न; कुणाची मैत्री आली आड?

googlenewsNext

कल्याणकल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसं  राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यात सेना आणि भाजप मध्ये राजकीय चिखलफेक सुरू असताना कल्याण डोंबिवलीही त्याला अपवाद कशी राहणार? मात्र घेतलेल्या भूमिकेवरून दुस-यांदा भाजपा पक्षाने यूटर्न घेतल्यानं भाजपा पक्षात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठा गाजावाजा करत भाजपाने पत्रकार परिषद घेत अपर पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा पत्रकार परिषद घेत  मोर्चा स्थगित केल्याची माहिती भाजपकडून घेण्यात आली.  भाजपाच्या बदलत्या भूमिकेमूळे  राजकीय वर्तुळात पुन्हा कुजबुज  सुरू झाली आहे. 

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांना टार्गेट केलं जातं असल्याचा आरोप करत भाजपाने महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पक्षाच्या ऑनलाईन बैठकीतही मोर्च्यावर आपण ठाम असल्याचं सांगण्यात आलं. मात्र शुक्रवारी अचानक अपर पोलीस आयुक्त कार्यालयावर आयोजित केलेला मोर्चा स्थगित करण्यात आली अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगण्याची नामुष्की भाजपावर ओढावली.  मात्र भाजपाने  अचानक कोलांटीउडी का मारली? याबाबत दबक्या आवाजात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते, पदाधिका-यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे. यावरून हा मोर्चा होऊ नये अशीच सरकारची भूमिका असल्याचं दिसून येत. नोटिसा झुगारून आम्ही मोर्चा काढला तर आमच्या असंख्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतील याची आम्हाला कल्पना आहे असं भाजपा आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांना अजून अडचणीत आणण्याची इच्छा नाही त्यामुळे काही कालावधीपुरता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. भाजपाकडून हे कारण सांगितलं जातं असलं तरी अलीकडच्या काळात  भाजपाच्या वतीने अनेक आंदोलनं शहरात करण्यात आली. मग त्यावेळी पोलिसांनी परवानगी दिली होती की नाही? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 
    केडीएमसीनं लागू केलेल्या घनकचरा व्यवस्थापन शुल्कावरून भाजप आणि सेनेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यावेळी सुद्धा आक्रमक होऊन भाजपाने केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा  केली होती. मात्र या निर्णयावरून ही पक्षाने यु टर्न घेतला होता. 

मैत्री आली आड? 

सेना आणि भाजपमध्ये तू तू मैं मैं चा खेळ सुरू असला तरी युती असो किंवा नसो  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची राजकारणापलीकडची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे राज्यात या दोन्ही पक्षात कितीही कटुता वाढत असली तरी स्थानिक पातळीवर जेव्हा जेव्हा विशेषतः सेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी भाजपानं माघार घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता या निर्णयावरूनही भाजपानं यु  टर्न घेतला असून यामध्ये ही वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची मैत्री आड आली का? अशी चर्चा सुरु झाली आहे. पण दुसरीकडे भाजपमधील कार्यकर्ते दुखावले गेले असल्याचं बोललं जातंय. याबद्दल काही कार्यकर्त्यांना विचारलं असता त्यांनी चुप्पी साधनंच पसंत केलं.

Web Title: What exactly is BJP doing? 'U' turn from the second decision taken; Whose friendship came first?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.