रुग्णालय कसले, हे तर प्राथमिक उपचार केंद्र; गंभीर रुग्णांची धाव ठाणे, मुंबईकडे
By प्रशांत माने | Published: August 16, 2023 11:13 AM2023-08-16T11:13:54+5:302023-08-16T11:14:27+5:30
या रुग्णालयाची अवस्था प्राथमिक उपचार केंद्रासारखी आहे.
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : केडीएमसीचे डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय आहे. मात्र तज्ज्ञ डॉक्टर आणि पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी गंभीर स्वरूपातील रुग्णांना ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयांची वाट धरावी लागते. रुग्णालयामध्ये मुबलक प्रमाणात औषधांचा साठा असल्याचा दावा केला जातो. मात्र गंभीर अवस्थेतील रुग्णावर उपचारच होत नसतील, तर त्याचा उपयोग काय, असा सवाल रुग्णांचे नातेवाइक करत आहेत. या रुग्णालयाची अवस्था प्राथमिक उपचार केंद्रासारखी आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयाचा मंगळवारी आढावा घेतला. येथील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसली, परंतु स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने तो विभाग बंद होता. त्वचारोग, जनरल विभाग, डोळे तपासणी, अस्थिरोग, नाक-कान-घसा आणि दंत उपचार, ताप रुग्ण तपासणी विभाग, रक्तपेढी विभाग एरवी सुरू असले, तरी मंगळवारी ओपीडीसह तेदेखील बंद होते. डेंग्यूच्या रुग्णाला रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागल्याचे दिसले.
रुग्णालयात अतिदक्षता (आयसीयू) विभाग आहे, पण बंद आहे. बर्न विभाग नसल्याने भाजलेल्या रुग्णांना येथे दाखल करून घेतले जात नाही. रुग्णालयात प्रसूती विभाग आहे, पण नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) पूर्ण तयार होऊनही तो बालरोग तज्ज्ञाअभावी बंद आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
खासगी रुग्णालयांचा आसरा
एरवी रुग्ण गंभीर झाल्यावर त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय (शीव, मुंबई) या ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांमध्ये पाठविले जायचे. परंतु कळवा येथील रुग्णालयामध्ये सध्या ओढावलेली परिस्थिती पाहता इथले गंभीर रुग्ण सध्या सायन अथवा केईएम रुग्णालयात पाठवले जात आहेत.