पाणीटंचाईमुळे तरुणीचा गेला असता जीव; कपडे धुण्यासाठी गेली होती खदानीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 01:39 PM2022-05-16T13:39:31+5:302022-05-16T13:39:48+5:30
डोंबिवली : भोपरच्या चाळीत राहणारी रिया महाले ही कपडे धुण्यासाठी चुलतीसोबत खदाणीवर गेली होती. भर उन्हात कपडे धुताना चक्कर ...
डोंबिवली : भोपरच्या चाळीत राहणारी रिया महाले ही कपडे धुण्यासाठी चुलतीसोबत खदाणीवर गेली होती. भर उन्हात कपडे धुताना चक्कर आल्याने ती तोल जाऊन पाण्यात पडली. मात्र, प्रसंगावधान राखून नविना दळवी या विवाहितने पाण्यात उडी घेऊन तिचा जीव वाचविला. पाच जणांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला, त्याच्या काही दिवसआधीच रिया महालेसोबत हा जीवघेणा प्रसंग घडला. या धक्क्यातून रिया अद्याप सावरलेली नसली तरी तिला आजही पाण्याअभावी कपडे धुण्यासाठी खदाणीवरच जावे लागते.
रिया ही डीएनसी येथे बारावीत शिकत आहे. रियाची चुलती लता यांनी सांगितले की, गायकवाड कुटुंबीयांची घटना घडण्यापूर्वी त्याच परिसरात असलेल्या अन्य एका खदाणीवर कपडे घुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत रिया होती. कपडे धुत असताना रियाला चक्कर आली. ती तोल जाऊन पाण्यात पडली. यावेळी तिथे असलेल्या महिलांनी लताला पाण्यात उडी घेण्यापासून रोखले. मात्र, नविना दळवी हिने प्रसंगावधान राखून रियाच्या दिशेने धुण्यासाठी आणलेली साडी पाण्यात फेकली. साडीला धरुन रियाला बाहेर खेचले. लता यांनी सांगितले की, त्यांच्या चाळीला पाणी येत नाही. अडीचशे लीटरचा टँकर घ्यावा लागतो. त्याला १०० रुपये मोजावे लागतात. महिन्याला पाण्यासाठीच तीन हजार रुपयांचा खर्च होतो. सगळ्य़ांनाच हा खर्च परवडणारा नाही. दोन दिवसाआड कपडे धुण्यासाठी खदाणीवर जावे लागते.
दोन वर्षांपूर्वी भोपर येथील खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका नर्सचा बुडून मृत्यू झाला होता. कपडे धुताना ती पाय घसरुन पाण्यात पडली होती. सायंकाळची वेळ असल्याने तिथे तिला वाचविण्यासाठी कोणी नव्हते. वर्षभरापूर्वी हेदुटणे येथील खदाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तिची आई आणि भाऊ बचावला होता.
...............
पाण्याचा बेकायदा उपसा
दगडखाणी उत्खनन करण्याच्या बदल्यात महसूल विभागाकडून कर गोळा केला जातो. दगड खाणीतून दगड निघणे बंद झाले की, खोदलेल्या खाणी तशाच पडून असतात. त्यात पावसाळ्य़ात पाणी साचते. याच खदाणीतून उपसा करुन ते बेकायदा बांधकामांना पाणी पुरविले जाते. खदाणी बुजवल्या पाहिजेत किंवा त्याच्या पाण्याचा वापर नागरिकांना कसा घरपोच होईल, याचा विचार झाला पाहिजे.
फाेटाे-डाेंबिवली-रिया महाले
---------------