खासदार, आयुक्त येणार समजताच KDMC यंत्रणा लागली कामाला; हॉस्पिटलबाहेरील कचऱ्याचा ढीग गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 03:45 PM2021-05-25T15:45:13+5:302021-05-25T15:45:57+5:30
डोंबिवलीत खासदार आणि आयुक्त येणार असल्याचे समजताच शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या बाहेर असलेला कचरा अखेर घाईघाईत आज उचलला गेला.
मयुरी चव्हाण
डोंबिवली - वास्तविक कल्याण डोंबिवली शहरात काही प्रश्न हे गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थेच आहेत.पण मनात आल तर प्राथमिक सोयीसुविधांच्या बाबतीत असलेल्या समस्या पटकन मार्गी लागु शकतात हे डोंबिवलीत नुकतंच समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या बाहेर गेल्या अनेक दिवसांपासून कच-याचा ढीग होता. अगदी सोमवारी सुद्धा या ठिकाणी कचरा असल्याचं लोकमतच्या कॅमेरात कैद झालं होतं. मात्र मंगळवारी येथील कचरा उचलण्याचं काम जोरात सुरू होतं. हे ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसला असेल.
मंगळवारी अचानक खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे शास्त्रीनगर रुग्णालयात पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं निश्चित झालं. आता दोन मोठ्या व्यक्ती येणार असल्यानं आजूबाजूचा परिसर हा स्वच्छच असलाच पाहिजे. मंगळवारी साडे अकरा वाजता खासदार शिंदे हे शास्त्रीनगर रुग्णालयात येणार होते. अगदी साडेअकरा होऊन गेले तरी रुग्णालयाबाहेरचा कचरा उचलण्याची लगीनघाई सुरू होती. यामुळे इच्छा तेथे मार्ग असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. रुग्णालयाबाहेरचा परिसर देखील स्वच्छ असणं आवश्यक आहे. कित्येक दिवसांपासून अगदी रस्त्याच्या बाजूला हा कचरा तसाच असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना देखील त्रास सहन करावा लागत होता.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. तत्कालिन आयुक्त ई रवींद्रन यांची पाहणी होणार असल्याच कळताच फेरीवाल्याना उठविण्यात आलं होतं।आणि आता देखील खासदार आणि आयुक्तांच्या पाहणीमुळे अखेर हॉस्पिटलबाहेरचा कचरा उचलण्यात आला. त्यामुळे असे दौरे वारंवार होत राहिले तर अनेक प्रश्न मार्गी लागतील अस म्हणणं वावग ठरणार नाही.