स्टेशनला गाडी थांबली की ते गाडीत बसायचे, नंतर सिग्नलला गाडी थांबली की ते महिला प्रवाशांना लक्ष्य करायचे
By मुरलीधर भवार | Published: April 27, 2023 07:40 PM2023-04-27T19:40:56+5:302023-04-27T19:41:11+5:30
अटक करण्यात आलेल्या चौकडीकडून साडे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
कल्याण - रेल्वे स्थानकात गाडी थांबताच ते गाडीत बसायचे आणि सिग्नल येताच महिला प्रवाशांची पर्स चोरी करुन पसार व्हायचे. महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारणाऱ्या चार जणांच्या चौकडीस कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिासंनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौकडीकडून साडे नऊ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रवी गायकवाड, गणोश राठोड, प्रकाश नागरगोजे आणि तानाजी शिंदे अशी आहेत.
काही दिवसापासून मेल एक्सप्रेस गाड्यातील महिला प्रवाशांना लक्ष्य करुन त्यांच्या पर्स चोरी केल्या जात असल्याच्या घटना घडत होत्या. त्याची गंभीर दखल पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी घेतली. या प्रकरणी लवकर तपास लावण्यात यावा असे आदेश दिले होते. या चोरीच्या घटनांचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस करीत होते. कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरशद श्ेाख यांनी चोरीच्या घटनांचा तपास सुरु केला. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासणी केली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित त्यांना आढळून आला.
या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रवि गायकवाड असे सांगितले. त्याने अन्य साथीदारांची नावेही सांगितले. तो अन्य तीन साथीदारांच्या मदतीने रेल्वेतील महिला प्रवाशांना लक्ष्य करीत होता. मेल एक्सप्रेस गाडी रेल्वे स्थानकात थांबताच ते त्याठिकाणी रेल्वे बोगीत चढायचे. प्रवासा दरम्यान गाडीला सिग्नल मिळताच गाडी थांबल्यावर क्षणाचाही विलंब न करता महिला प्रवाशांच्या पर्स हिसकावून पसार व्हायचे. या चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघाजणांपैकी तीन जण पुण्यात आणि एक जण छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. या चौघांकडून जवळपास साडे नऊ लाख रुपये किंमतीचे त्यांनी चोरी केलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.