आमचा बाकीचा पगार गेला कुठे?; केडीएमसीतील कचरा कंत्राटी कामगारांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:36 AM2022-03-25T10:36:09+5:302022-03-25T10:36:25+5:30
कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या काही प्रभागांत कंत्राटदाराकडून कचरा उचलला जातो. हा कंत्राटदार त्याच्या कामगारांना कमी पगार देत ...
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या काही प्रभागांत कंत्राटदाराकडून कचरा उचलला जातो. हा कंत्राटदार त्याच्या कामगारांना कमी पगार देत आहे. त्यामुळे आमचा बाकीचा पगार गेला कुठे? असा संतप्त सवाल कामगारांनी केला आहे. दरम्यान, ही माहिती कामगारांनी माहिती अधिकारात उघड केली आहे.
विशाल एंटरप्राइजेस कंपनीने केडीएमसीला ४०० कंत्राटी कामगार पुरविले होते. हे कामगार २०१८ पासून काम करीत आहेत. ४०० पैकी १२० कामगार हे कचरा गाडीवरील चालक असून, २८० सफाई कामगार आहेत. विशाल एंटरप्राइजेसचे कंत्राट ३१ मार्चला संपुष्टात येणार आहे. कंत्राटी कामगार अमित साळवे यांनी माहिती अधिकारात केडीएमसीकडे माहिती मागितली असता मनपाच्या दप्तरी वाहन चालकास १७ हजार ५३९ रुपये, तर सफाई कामगाराला १८ हजार ४१६ रुपये पगार दर महिन्याला दिला जाईल, असे नमूद आहे; परंतु प्रत्यक्षात एका कामगाराला १० हजार ३०० रुपये पगार दिला जातो. प्रत्येक कामगारामागे ७ ते ८ हजार रुपये दरमहिन्याला गेले कुठे? यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न केला जात आहे.
विशेष म्हणजे, कंपनीने प्रत्येक कामगाराचा ४० हजार पीएफ, तीन महिन्यांचा थकलेला पगार, तसेच दोन वेळचा बोनस दिलेला नाही. कामगारांची आर्थिक लूट झाली आहे. त्याविषयी महापालिका प्रशासनाकडून न्याय मिळत नाही. दरम्यान, कंपनीच्या शीतल शिरसाठ यांनी कामगारांना कुठेही जाऊ नका. पैसे मिळतील, तसेच कंपनीचा मनुष्यबळ विकास अधिकारी (एचआर) अमित झळपे हे आजारी असल्याचे सांगितले आहे.
‘चर्चेअंती तोडगा काढू’
याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे म्हणाले की, कंत्राटदाराला जो निविदा दर निश्चित झाला आहे, त्यानुसार महापालिका वेतन अदा करते. याबाबत संबंधित कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित बोलावून चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची शहानिशा करत कारवाई करण्यात येईल.