जिथे शिवसेनेचा खासदार तिथे निवडणूक लढविणार; डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 11:03 AM2023-06-05T11:03:14+5:302023-06-05T11:03:58+5:30
बॅनर लावून कोणी खासदार होत नाही. प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दाैरे वाढल्यामुळे या मतदारसंघावर भाजप दावा करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे, तेथे शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढविणार, असे स्पष्टीकरण कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.
भाजपने मिशन ४५ हे लोकसभा निवडणुकीसाठी लक्ष्य ठेवले आहे. यात कल्याण आणि पालघर मतदारसंघांचा समावेश आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. ऑक्टाेबरपासून ठाकूर यांचे दाेन दाैरेही झाले आहेत. याबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार, असे कोण म्हणाले? त्यांचे नाव घ्या. भाजप नेत्यांच्या दाैऱ्यांमुळे आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली संघटना बांधण्याचा अधिकार आहे. शिवसेनेचे खासदार असलेल्या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार लढणार, हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. ठाकूर हे माझे मित्र आहेत, त्यांचे नेहमीच मी स्वागत केले आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा झाला. या प्रसंगी खासदार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
बॅनर लावल्याने कोणी खासदार होत नाही?
कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे संपर्कप्रमख माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे बॅनर लावण्यात आले. राष्ट्रवादीने कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडली आहे. यावर खासदार शिंदे यांनी सांगितले की, बॅनर लावून कोणी खासदार होत नाही. प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
माझे उत्तर कामातून असेल
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, माझ्यावर टीका करा. माझे उत्तर हे कामातून असेल. आम्ही कधी पातळी सोडलेली नाही. साेडणारही नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडविण्याचे काम ते करीत असल्याची टीका खा. शिंदे यांनी केली.