स्मार्ट सिटी अंतर्गत पुलाचा पाया खणत असताना पालिकेची पाईपलाईन फुटली
By अनिकेत घमंडी | Published: October 27, 2023 09:01 AM2023-10-27T09:01:06+5:302023-10-27T09:01:30+5:30
तिसऱ्या माळ्यापर्यंत पाण्याचे उंच फवारे , लाखो लिटर पाण्याचे नासाडी
कल्याण: येथील पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेचं पूल उभारणीचं काम सुरू आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रस्ता खोदत असताना पोकलनचा पाण्याच्या पाईपलाईनला फटका लागल्याने ही पाईपलाईन फुटली. ही मोठी पाईपलाईन फुटल्याने जवळपास तिसऱ्या मजल्या पर्यंत पाण्याचे फवारे उडत होते . जवळपास दीड ते दोन तास पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे स्टेशन परिसर जलमय झाला होता.
रेल्वे स्टेशन परिसरातील पाण्याच्या प्रवाहामुळे पार्किंग मधील बाईकचे देखील नुकसान झाले . त्याचप्रमाणे रेल्वे पोलीस ठाण्यात देखील पाणी शिरले होते.या घटनेमुळे स्टेशन परिसरात घरी परतणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी या पाईपलाईन वरील पाणीपुरवठा बंद करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले .दोन तासानंतर हा पाणी पुरवठा बंद करण्यात आला.