आनंद ग्लोबल शाळेत कोण होणार ‘मुख्यमंत्री’..?; १५ ऑगस्टला लागणार निकाल
By सचिन सागरे | Published: August 5, 2023 03:27 PM2023-08-05T15:27:57+5:302023-08-05T15:28:59+5:30
निवडणुक रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना चिन्हे देण्यात आली होती. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासून त्यांच्या बोटाला शाई लावत चिन्हासमोरील नावापुढे बटन दाबण्यास सांगितले.
कल्याण - लोकशाहीतून होणाऱ्या निवडणुका शालेय जीवनातच समजाव्यात यासाठी पूर्वेकडील आनंद ग्लोबल शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. २७ उमेदवारांचे भवितव्य सध्या मतपेटीमध्ये बंद असून १५ ऑगस्ट रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नऊ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. शैक्षणिक वर्षामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निर्मिती केली जाते.
निवडणुक रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना चिन्हे देण्यात आली होती. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे ओळखपत्र तपासून त्यांच्या बोटाला शाई लावत चिन्हासमोरील नावापुढे बटन दाबण्यास सांगितले. २७ उमेदवारांनी आपापल्या परीने पाचवी ते दहावीतील मतदारांना जागरूक राहून मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. भविष्यात मी तुमच्यासाठी काय काय काम करेन? याची आश्वासक यादी विद्यार्थ्यांना सांगितली.
देशातील लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका कशा पद्धतीने होतात याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी दरवर्षी असा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्था चालक आशिष पाटील यांनी सांगितले. नऊ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांना ५१५ विद्यार्थ्यांसह २७ शिक्षक तसेच ७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मतदान केल्याची माहिती मुख्याध्यापिका रूपाली पाटील यांनी दिली.
पुढील पदांसाठी घेण्यात आली निवडणूक
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रीडामंत्री, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री, विज्ञान मंत्री, साहित्य मंत्री व शिस्त मंत्री.