डोंबिवलीतीलच का? सगळेच कारखाने हलवा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 10:37 AM2022-02-20T10:37:22+5:302022-02-20T10:38:04+5:30

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीतील १५६ प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दोन आठवड्यांपूर्वी दिले.

Why in Dombivali Move all the factories minister subhash desai orders to move156 factories | डोंबिवलीतीलच का? सगळेच कारखाने हलवा! 

डोंबिवलीतीलच का? सगळेच कारखाने हलवा! 

Next

मिलिंद बेल्हे

मुंबई माझी आई, तर डोंबिवली माझी मावशी आहे, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल-परवाच सांगितले. खरे तर डोंबिवली हे त्यांचे आजोळ; पण २४ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या हाती सत्ता असूनही येथील पर्यावरण बिघडलेले आहे. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीतील १५६ प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दोन आठवड्यांपूर्वी दिले. रासायनिक सांडपाणी-वायूमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. एमआयडीसीच्या या न्यायाने ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकणपट्टीतील आणि पुढे राज्यातील प्रदूषणकारी उद्योगही बंद होणार, अशी आशा त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना वाटते. 

डोंबिवलीची एमआयडीसी पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. ही एमआयडीसी सुरू झाल्यापासून तिचा बफर झोन पाळला नाही. पुढे या औद्योगिक वसाहतीला खेटून निवासी वसाहत झाली. काही बंद कारखान्यांच्या जागेवर इमारती उभ्या राहिल्या. अनेक लघु उद्योग, पूरक उद्योग, सेवा सुरू झाले. कामगारांच्या वसाहती आल्या. या साऱ्या आता रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे न्याव्या असा सरकारचा आदेश आहे. अशा पद्धतीने ५०-५० वर्षांचे उद्योग हलविणे हा पोरखेळ आहे का? प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर उद्योग हटवण्याच्या मागणीने जोर धरला. कारखान्यांच्या स्थलांतराचे आश्वासन देण्यात आले आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

एमआयडीसीला खेटून एकीकडे शीळपर्यंत आणि दुसरीकडे पत्री पुलापर्यंत अनेक भव्य गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली पालिका, एमएमआरडीएचे विकास प्रकल्प कागदावर तयार आहेत. तेथून मेट्रो जाणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉर जाईल. काटई ते ऐरोली मार्ग पूर्ण होईल. तेथून बुलेट ट्रेनचे म्हातार्डी स्टेशन जवळ असेल. तासाभरावर नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या साऱ्यांना भाव न मिळण्यास कारण ठरत होती, ही प्रदूषणकारी औद्योगिक वसाहत. आता कारखाने हटवल्यावर उत्तुंग इमारती, कॉर्पोरेट ऑफिसेस, मॉलसाठी भरपूर मोकळी जागा उपलब्ध होईल. बिल्डर लॉबी खुश होईल व काही कारखानदारही. कारण काही उद्योग बंद करण्याचे नियोजन असूनही जागा जाईल या भीतीपोटी ते करता येत नव्हते. 

जागा सोन्याची खाण ठरतील

  • आमचे वय झाले आहे, कामगारांचे वय झाले आहे... आता पाताळगंगेपर्यंतचा प्रवास कसा होणार, असा सूर आताच अनेक कारखानदारांनी लावला आहे. 
  • त्यामुळे देणी देऊन जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबईतील गिरण्यांच्या जमिनींप्रमाणे या जागा सोन्याची खाण ठरतील. यात कामगार भरडला जाईल. 
  • कारखाना जगला तर कामगार जगेल, हे शिवसेनेच्या कामगार संघटनेचे ब्रीद; पण कारखानाच अस्तित्वात नसेल तर या वचनाला जागण्याची वेळ कुणावर येणार नाही!

Web Title: Why in Dombivali Move all the factories minister subhash desai orders to move156 factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.