पत्नी सोडून गेली, चिमुकलीचा सांभाळ कसा करणार? सोडून पळणाऱ्या बापाला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 02:10 AM2021-01-06T02:10:43+5:302021-01-06T07:27:24+5:30
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या गुरूदेव हॉटेल येथील स्कायवॉकच्या खाली एक व्यक्ती लहान बाळाला घेऊन उभा होती. काही वेळानंतर ती व्यक्ती हातातील लहान बाळ तेथेच सोडून जाऊ लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पत्नी सोडून गेल्याने चिमुकलीचे पालनपोषण कसे करणार, या चिंतेने ग्रासलेल्या बापाने तिला सोडून पळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कल्याणमध्ये सोमवारी घडला. परंतु, नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्रयत्न फसला असून, त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर, पावणेतीन महिन्यांच्या मुलीला डोंबिवलीतील जननी आशिष या संस्थेत ठेवण्यात आले आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या गुरूदेव हॉटेल येथील स्कायवॉकच्या खाली एक व्यक्ती लहान बाळाला घेऊन उभा होती. काही वेळानंतर ती व्यक्ती हातातील लहान बाळ तेथेच सोडून जाऊ लागली. या बाबत त्यांनी त्याच्याकडे विचारणा करता तो घाबरला तरुणींनी आरडाओरड करून आजुबाजूच्या नागरिकांना सतर्क करत त्याला पकडले.
पोलिसांनी चौकशी करताच त्याचे नाव खलील शेख (रा. कळवा) असल्याचे समजले. खलीलला दोन महिने २३ दिवसांची मुलगी असल्याचे यावेळी उघडकीस आले. पत्नीअभावी मुलीचा सांभाळ कसा करायचा, याची चिंता त्याला असावी आणि त्या चिंते पोटीच त्याने चिमुकलीला सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.