पत्नीचा वाढदिवस यंदा साधेपणाने, पूरग्रस्तासाठी 5 लाखांची मदत मोठ्या मनाने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 09:35 PM2021-07-28T21:35:29+5:302021-07-28T21:36:41+5:30
डोंबिवली शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना १० हजार कीटचे (सामान) वाटप करण्यात येणार आहे. त्यातील एक हजार कीटसाठी लागणारी रक्कम रुपये पाच लाख रुपयांचा धनादेश विनायक पाटील व त्यांची पत्नी सुजाता पाटील यांनी शिवसेनेकडे सुपूर्द केल्याचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.
कल्याण - शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोकण व पश्चिम महाराष्ट्र येथील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीचा ओघ सुरु केल्याचं दिसून येतंय. डोंबिवली पुर्वेकडील चोळेगाव येथील उद्योगपती विनायक पाटील यांनी पत्नी सुजाता यांच्या वाढदिवसानिमित्ताने पूरग्रस्तांना तब्बल 5 लाख रुपयांचा धनादेश देऊ केला. हा धनादेश त्यांनी डोंबिवलीशिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
डोंबिवली शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना १० हजार कीटचे (सामान) वाटप करण्यात येणार आहे. त्यातील एक हजार कीटसाठी लागणारी रक्कम रुपये पाच लाख रुपयांचा धनादेश विनायक पाटील व त्यांची पत्नी सुजाता पाटील यांनी शिवसेनेकडे सुपूर्द केल्याचे शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. तर पत्नीचा ५० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात करणार होतो. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे आम्ही वाढदिवस मोठ्या थाटातमाटात न करता पूरग्रस्तांना मदत केली, असे विनायक पाटील म्हणाले. वाढदिवसाचा खर्च टाळत पाटील दाम्पत्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केल्याने या दाम्पत्यांच सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील विविध भागातून पूरग्रस्त भागात मदत पोहोचत आहे. मात्र, येथील परिस्थिती अतिशय विदारक असल्याने आणखी मदतीची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फूल नाही फुलाची पाखळी मदत करा, असे आवाहन जनतेला केले होते.