'आप'चा झाडू कल्याण- डोंबिवलीत चालणार का?; महानगरपालिकेच्या निवडणूकीचं वाजलं बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 10:13 PM2021-08-12T22:13:52+5:302021-08-12T22:14:43+5:30
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते यांची मेळावा बैठक आयोजित करण्यात आलेली.
कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच बिगुल वाजले असून आता राजकीय पक्षांमध्ये विविध मुद्द्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला दिसतोय. आता आम आदमी पक्षानेही आपली भूमिका मांडली असून आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांनी आम्हाला सत्ता दिल्यास दिल्लीप्रमाणे नागरी कल्याण डोंबिवलीत सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आपकडून देण्यात आलय.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते यांची मेळावा बैठक आयोजित करण्यात आलेली. यावेळी आपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी हे आश्वासन दिलंय.केडीएमसीच्या सगळ्या जागा आम्ही लढवणार आहोत असही त्यांनी यावेळी सांगितले.
महापालिकेची परिवहन सेवा तोट्यातून फायद्यात चालवून प्रवाशांना वेळापत्रकानुसार बससेवा पुरविणे, फेरीवाल्यांना दोन वर्षांत फेरीवाला धोरणानुसार टप्प्याटप्प्याने जागा निर्धारित करून देणे, खड्डेमुक्त आणि सुरक्षित दर्जेदार रस्ते, महापालिकेतील टक्केवारीने बरबटलेली भ्रष्टाचारी साखळी मोडीत काढणे, महिला - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, मोफत पाणी या सुविधा आपकडून नागरिकांना दिल्या जातील असही यावेळी सांगण्यात आलं आहे.
केडीएमसी निवडणुकीत सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा मानस आपनं व्यक्त केलाय. मात्र आपच्या झाडूला कल्याण डोंबिवली शहरात कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.