दिवा स्थानकातून लोकल सुटणार? खासदार श्रीकांत शिंदेंनी मांडल्या समस्या
By अनिकेत घमंडी | Published: January 31, 2024 05:17 PM2024-01-31T17:17:13+5:302024-01-31T17:17:30+5:30
मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता यावर मुद्यावर चर्चा करताना मध्य रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक काही करता येईल असे आश्वासन दिले.
डोंबिवली : दिवा शहरातून डोंबिवली येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. शालेय विद्यार्थ्यांसोबत त्यांना ने-आण करणारे पालक विशेषतः महिला या मोठ्याप्रमाणात दिवा-डोंबिवली-दिवा असा रोजचा प्रवास करतात. मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला होता यावर मुद्यावर चर्चा करताना मध्य रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक काही करता येईल असे आश्वासन दिले.
दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी सांगितले की, मुलांना शाळेत सोडते आणि आणते वेळीच फास्ट लोकल, एसी लोकल, दोन लोकलच्या वेळेलमधील अंतर खूप जास्त, नेहमीच उशिराने येणाऱ्या लोकल यामुळे उपलब्ध लोकल मध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी होते याशिवाय फलाटांवर खूप वेळ ताटकळत बसावं लागत, छोटेमोठे अपघात यासर्व गोष्टींना सामोरे जावे लागते.
दिवा स्थानकात सकाळी ९:४० ची कल्याण ला जाणारी लोकल गेल्यानंतर १० वाजताची एसी लोकल येते आणि त्यांनतर १० वाजून १८ मिनिटांची कल्याण लोकल येते सदर ची कल्याण लोकल नेहमीच ८ ते ९ मिनिटे उशिराने येते. सकाळी ९:४० नंतर साधारण अर्धा तास लोकल नसल्याने फलाटावर विद्यार्थी आणि पालकांची व इतर प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते.
त्याचप्रमाणे संध्याकाळी शाळा सुटण्याच्या वेळेस म्हणजेच संध्याकाळी ५:१५ ते ६ वाजेपर्यंत डोंबिवली स्थानकातून दिवा स्थानकात येण्यासाठी १६ लोकल मुंबईच्या दिशेने जातात.
या १६ लोकल पैकी तब्बल १२ लोकल या जलद आहेत या जलद लोकल पैकी फक्त १ लोकल ला दिवा स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय १ लोकल एसी आहे.
म्हणजेच संध्याकाळी ५ : १३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असणाऱ्या १६ लोकल पैकी फक्त ४ लोकल या दिवा स्थानकात थांबतात. या ४ लोकल सुद्धा नेहमीच उशिराने धावत असल्यामुळे लोकल मध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे लहान मुलांना घेऊन लोकल मध्ये चढण्यासाठी त्यांच्या पालकांना खूप कठीण जाते. अशावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या चर्चेनंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी निश्र्चितच समस्या असून ती सोडवण्यावर भर देण्यात येईल असे खासदार शिंदे यांना आश्वासन दिले.