कचरा गोळा करुन 'तिच्या' घरात आली लक्ष्मी; पिकअप गाडी घेतल्यानं झालं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:43 PM2022-01-25T18:43:10+5:302022-01-25T18:43:29+5:30
कचरा वेचण्याच्या कामातून पैसा कमावून कचरा गोळा करण्यासाठी चक्क खरेदी केली बोलोरे पिकअप गाडी.
कल्याण : निर्माण होणारा कचरा हा फेकून दिला जात असला तरी तो योग्य प्रकारे गोळा केला तर तो धनकचरा ठरू शकतो. हीच किमया कचरावेचक महिला रेखा लाखे यांनी साधली आहे. त्यांनी कचरा वेचण्याच्या कामातून पैसा कमावून कचरा गोळा करण्यासाठी चक्क बोलोरे पिकअप गाडी घेतली. यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रोत्साहन आणि सहकार्य केल्याने त्यांच्यासह अन्य कचरावेचकांच्या हाताला काम मिळाले आहे.
महापालिकेने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २५ मे २०२० पासून शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यास सुरुवात केली. ती प्रत्यक्षात आण्यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रयत्न सुरू केले. महापालिकेने आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकणे बंद केले होते. त्यामुळे त्याठिकाणी कचरा वेचणाऱ्या जवळपास ४०० कचरा वेचकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने त्यापैकी काही कचरा वेचकांना क आणि ब प्रभाग क्षेत्रातील ५० सोसायट्यांमधून सुका कचरा गोळा करण्याची परवानगी दिली. त्यासाठी रेखा यांनी पुढाकार घेतला. त्या गोळा केलेल्या प्रतिटन कचऱ्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची रॉयल्टी महापालिकेस देतात.
त्यांनी गोळा केलेल्या कचऱ्यापैकी विक्री योग्य कचऱ्यातून त्यांना उत्पन्न मिळते. उर्वरीत कचरा रिसायकलिंगसाठी जातो. कचऱ्यातून त्यांनी पैसा कमावून चक्क बोलेरो पिकअप गाडी खरेदी केली आहे. सध्या हा प्रयोग दोन प्रभाग क्षेत्रात राबविला जात असला तरी उर्वरीत ठिकाणीही तो राबविण्याचा मानस उपायुक्त कोकरे यांनी व्यक्त केला.