महापालिका रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू; उल्हासनगरमधील प्रकार
By सदानंद नाईक | Published: August 11, 2024 08:33 PM2024-08-11T20:33:17+5:302024-08-11T20:35:24+5:30
या प्रकरणी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उल्हासनगर : रिजेन्सी येथील महापालिका रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान शीला चौहान नावाच्या ५० वर्षीय महिलेचा शस्त्रक्रिया दरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती महापालिका वैधकीय अधिकारी डॉ मोहिनी शर्मा यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने कोरोना काळात रिजेन्सी अंटेलिया येथे २०० बेडचे रुग्णालय उभारून १५ कोटी पेक्षा जास्त किंमतीचे यंत्रसामग्री व साहित्य खरेदी केले. तब्बल दोन वर्षे उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेले महापालिका रूग्णालय अचानक कॅशलेसच्या नावाखाली एका खाजगी संस्थेला महापालिकेने चालविण्यास दिले आहे. शनिवारी सायंकाळी अंबरनाथ बुवापाडा येथील अंदाजे ५० वर्ष वर्षाच्या शीला चौहान या महिलेची शस्त्रक्रिया होती. शस्त्रक्रियेला नेल्यावर महिलेचा मृत्यू झाल्याचे, रूग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना सांगण्यात आले. या घटनेचा त्यांना धक्का बसून त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करून कारवाई करण्याची मागणी केली. समाजसेवक व भाजपचे पदाधिकारी संजय गुप्ता यांनी रात्री १० वाजता रुग्णालयात धाव घेऊन, नातेवाईकांचे सांत्वन करून, झालेल्या प्रकारची चौकशी करण्याची मागणी केली.
रुग्णालयात शस्त्रक्रिया दरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती महापालिका वैधकीय अधिकारी मोहिनी शर्मा यांनी दिली. तर आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही. यापूर्वीही रुग्णालयाच्या एका सुरक्षा रक्षकाने पगार वेळेवर होत नसल्याचा आरोप करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रुग्णालयाने मृत सुरक्षारक्षकांच्या नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळून कुटुंबाला आर्थिक मदत केली होती.