देव तारी त्याला कोण मारी! उद्यान एक्स्प्रेसखाली येऊनही महिला सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:40 PM2021-06-17T18:40:41+5:302021-06-17T18:41:50+5:30
Accident Case : बदलापूर डाऊन मार्गावरील घटना; कल्याण लोहमार्ग पोलिसांची चांगली कामगिरी
डोंबिवली - मानसिक स्थिती चांगली नसलेली एक महिला बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळात खडीवर झोपली होती, त्या दरम्यान तिच्या अंगावरून उद्यान एक्स्प्रेस गेली असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन कळताच गाडी अचानक थांबवण्यात आल्याची घटना बदलापूर स्थानकादरम्यान गुरुवारी घडली. त्याबाबत प्रसंगावधान ठेवून स्टेशन मास्तरांनी ऑनड्युटी पोलीस स्टाफला उद्घोषणा यंत्रावरून घटनास्थळी पाठवले. सुदैवाने ती महिला वाचली आणि त्या अपघातात तिला काहीही इजा पोहोचली नसल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
सकाळी साधारण ९ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास डाऊन ट्रॅकवर ही घटना घडली. सुमारे ३५ वयाची ती अनोळखी महिला ही गाडी खाली डाऊन ट्रॅकवर सुखरूप मिळून आली. ती खडीवर झोपलेल्या अवस्थेत असल्याने, तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखमा व इजा झाली नाही. त्यानुसार तीला आरपीएफ स्टॉप वर स्टेशन मास्टर लायसन्स पोर्टर स्टेचर हमाल यांच्या मदतीने बदलापूर ते, अंबरनाथ दरम्यान घटनास्थळावरून स्टेशन मास्टर समोर आणले. काही वेळाने सखोल चौकशी केली असता ती महिला घरगुती मानसिक तणावामुळे त्या ठिकाणी आल्याचे सांगितले. त्यानंतर तिने तिचे नाव श्रुती विशाल माळवे, राहणार मालप्लाझा सोसायटी/101 बदलापूर पूर्व अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तिच्यासमवेत दिलेल्या पत्यावर घरी जाऊन तिची आई प्रमिला अनिल शिंदे वय वर्ष ५९ धंदा घरकाम यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांनी रीतसर जबाब घेऊन तिच्या ताब्यात देण्यात आले. सदर महिलेबाबत तिच्या आईची काही एक तक्रार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
तसेच गेल्या आठ वर्षापासून तीची मानसिक स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. अधून मधून घराबाहेर जात असते. आजही घरातून निघून गेली असल्याचे सांगण्यात आले. मात्र आरपीएफ महिला यांनी तिला सुखरूप ताब्यात दिले, त्याबद्दल त्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी शार्दूल यांनी दिली.