केडीएमसीच्या जे प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक, शिलाई मशीन आणि घरघंटी करीता एकच गर्दी
By मुरलीधर भवार | Published: March 16, 2024 06:55 PM2024-03-16T18:55:53+5:302024-03-16T19:07:29+5:30
राज्य सरकारच्या योजनेतून महिलांना सक्षमीकरणाकरीता शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप केले जाणार असल्याने महिलांची माहिती आणि यादी तयार करण्यात आली.
कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील गरजू महिलांना राज्य सरकारच्या योजने अंतर्गत शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप केले जाणार आहे. या वाटपात सुसूत्रता नसल्याने आज महिलांनी थेट महापालिकेचे कल्याण पूर्वेतील जे प्रभाग गाठले. महिलांची गर्दी पाहून सुरक्षा रक्षकांनी गेटला टाळे ठोकले. त्यामुळे काही महिला कार्यालयाच्या बाहेर तर काही महिला कार्यालयात अशी स्थिती उद्भवली होती. या स्थिती पश्चात प्रभाग अधिकारी त्याठिकाणी नव्हत्या. त्याच्या केबीनला चक्क कुलूप होते.
राज्य सरकारच्या योजनेतून महिलांना सक्षमीकरणाकरीता शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप केले जाणार असल्याने महिलांची माहिती आणि यादी तयार करण्यात आली. याचा जाहिर कार्यक्रम कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील मैदानात १३ मार्च राेजी पार पडला. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते केवळ प्रातिनिधीक सहा महिला लाभार्थींना शिलाई मशीन आणि घरघंटीचे वाटप करण्यात आले. त्याठिकाणी महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. महापालिकेकडून योग्य सुचना आणि माहिती महिलांना दिली गेली नसल्याची तक्रार करीत दुसऱ््याच दिवशी काही महिलांनी महापालिकेचे मुख्यालय गाठले. मात्र महापालिका आयुक्त इंदूूराणी जाखड या उपस्थित नव्हता. त्या सांयकाळी कार्यालयात परतल्या. महिलानी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी लाभार्थींना शिलाई मशीन आणि घरघंटी मिळेल असे सांगितले होते. आज पुन्हा काही महिलांच्या मोबाईलवर महापालिकेचे मेसेज आले.
कागदपत्रे घेऊन ती छाननी करीता प्रभाग कार्यालयात यावे. हा मेसेज पाहून महिलांनी जे प्रभाग कार्यालयात धाव घेतली. त्याठिकाणी महिलांची गर्दी पाहून सुरक्षा रक्षकाने गेटला कुलूप लावून घेतले. त्यामुळे काही महिला या कार्यालयात तर काही महिला कार्यालयाच्या बाहेर होत्या. त्यांच्याकडून आम्हाला शिलाई मशीन दिले जाणार नसेल तर आम्हाला याठिकाणी कागदपत्रे घेऊन बाेलावले का? कार्यालयात प्रभाग अधिकारी नव्हत्या. त्यांच्या केबीनला कुलुप होते. महापालिका मुख्यालयातून पाठविलेल्या दोन महिला कर्मचारी त्या लाभार्थी महिलांची कागदपत्रे जमा करुन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होत्या. आज शनिवारी सुट्टी असून देखील प्रभाग कार्यालय सुरु होते. कार्यालय शनिवार असल्याने हाफ डे सुरु राहणार होते. त्यामुळे अन्य स्टाफ दुपारनंतर पळाला. ज्या महिला आल्या. ज्यांना कार्यालयात प्रवेश दिला गेला. त्यांची कागदपत्रे तपासणी केली. मात्र ज्या बाहेर होत्या त्यांनी कुलूप ठोकलेल्या गेटच्या बाहेरच ठिय्या दिला. या संदर्भात प्रभाग अधिकारी सविता हिले यांच्याकडे विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.