कल्याणच्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:45 AM2021-01-12T00:45:04+5:302021-01-12T00:45:20+5:30
लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच तो सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे दिली. पत्रीपुलाच्या कामाची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश जाधव, कैलास शिंदे, नवीन गवळी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे मार्गांवरील भागात पत्रीपुलाचा गर्डर टाकल्यानंतर तेथे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. स्लॅबचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पोहोच रस्त्याचे कामही आता पूर्ण होत आले आहे. त्यामुळे हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटामुळे या पुलाच्या कामाला विलंब झाला आहे. रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळाने पत्रीपुलाच्या कामाला सहा महिन्यांची मुदतवाढ अलिकडेच दिली होती. त्यानंतर या पुलाचे काम एप्रिल, २०२१ मध्ये निश्चित पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्या आधीच पुलाचे काम पूर्ण होत असल्याचे शिंदे म्हणाले.
विरोधकांचा मुद्दा संपुष्टात
पत्रीपुलाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यावर मात करीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाच्या विलंबामुळे विरोधकांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र, पुलाचे काम मार्गी लागत असल्याने विरोधकांचा मुद्दाच संपुष्टात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.