मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम मार्च 2022 अखेर पूर्ण होणार - श्रीकांत शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 02:41 PM2021-09-04T14:41:17+5:302021-09-04T14:43:33+5:30
Shrikant Shinde : आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली.
कल्याण : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु असले तरी हे काम आत्ता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम येत्या मार्च 2022 अखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर मुंब्रा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीच्या गार्डच्या केबीनमध्ये बसून पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लेनच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी ही होते. त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी रमेश म्हात्रे, सदानंद थरवळ, राजेश कदम आदी उपस्थित होते.
खासदार शिंदे यांनी सांगितले की, पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लेनचे काम मार्गी लागल्यावर 25 ते 30 गाड्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत. या लेनच्या अभावी यापूर्वी एक एक्सप्रेस गाडीच्या मागे तीन लोकल गाड्यांचा खोळंबा होत होता. लेनचा विस्तार झाल्याने जलद गाड्यांसाठी दोन, स्लो गाड्यांसाठी दोन आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी दोन लेन उपलब्ध होतील. त्यामुळे रेल्वे गाडय़ांचा खोळंबा होणार नाही. त्याचा मोठा फायदा प्रवासी वाहतूकीसाठी मालवाहतूकीसाठी होणार आहे.
रेल्वे मार्गावर यापूर्वी ठाकूर्ली, आंबिवली, दिवा आणि कळवा खारेगाव येथे मॉन क्रॉसिंग होते. ठाकूर्ली आणि आंबिवली येथील मॅन क्रॉसिंग बंद करण्यात आले आहे. त्याठिकाणी पूल उभारले गेले. ते वाहतूकीसाठी खुले करण्यात आलेले आहे. खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाचे कामही येत्या दोन महिन्यात पूर्ण झाल्यावर खारेगावचे मॅन क्रॉसिंग बंद होईल. दिव्याचेही मॅन क्रॉसिंग बंद केले जाणार आहे.
कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची पाहणीही खासदारांनी यावेळी केली. कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून त्याचा वापरही सुरु झाला आहे. काही छोटी मोठी कामे बाकी आहे विजेचे दिवे लावण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर अप्पर कोपरचा पूल अरुंद आहे. तो दुप्पटीने वाढविण्याचा प्रस्ताव आहे.
याशिवाय कोपर येथून कल्याण डोंबिवली महापालिकेचा रिंग रोड जात आहे. कोपर रेल्वे स्थानक ते रिंग रोडला कनेक्टीव्हीटी असलेला रस्ता तयार करण्याच्या सूचना यावेळी अधिकारी वर्गास खासदारांनी दिल्या आहे. त्याचाही विचार केला जाणार आहे. कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म प्रमाणो दिवा स्थानकातील होम प्लॅटफार्म करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यात काही तांत्रिक अडचणी असल्या तरी त्या दूर करुन होम प्लॅटफार्म करण्यास रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखविली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.