वडोदरा-मुंबई महामार्गावरील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम सुरू
By पंकज पाटील | Published: December 9, 2022 06:32 PM2022-12-09T18:32:02+5:302022-12-09T18:33:07+5:30
हाच महामार्ग पुढे दिल्लीला जोडण्यात येणार आहे
पंकज पाटील, बदलापूर: वडोदरा-मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले असून या महामार्गातील सर्वात अवघड टप्पा असलेल्या बदलापूर पनवेल बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तब्बल सव्वाचार किलोमीटरच्या या बोगद्याचे काम अडीच वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या बोगद्यामुळे बदलापूर शहर देखील पनवेलची जोडला जाणार आहे.
बडोदरा - मुंबई महामार्ग उभारण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य जागेचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल दीडशे किलोमीटरच्या पट्ट्याचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. तलासरी ते पनवेलमार्गे जेएनपीटीला जोडणारा हा महामार्ग महत्त्वाचा टप्पा असून त्या टप्प्यात बदलापूर आणि पनवेलच्या मध्यावर असलेल्या बेंडशीलच्या डोंगरातून बोगदा तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी मोठी यंत्रणा या ठिकाणी राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्गअंतर्गत मुंबई - बडोदरा महामार्ग उभारला जात असून हाच महामार्ग पुढे दिल्लीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत - दिल्ली प्रवास जलद गतीने होण्यासाठी या महामार्गाचा वापर केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर अंबरनाथ तालुका नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाशी जलद गतीने जोडला जाणार आहे.
या महामार्गामुळे केवळ विमानतळ जोडले जाणार नसून या बदलापूर परिसरात केंद्र सरकार मार्फत 400 एकर जागेमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा प्रस्ताव देखील आहे. # या महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटरला महामार्गावर जाण्यासाठी आणि महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी जोड रस्ता तयार केला जाणार आहे. कल्याण ग्रामीणमध्ये रायताजवळ आणि बदलापूर ग्रामीण मध्ये जुवेली गावाजवळ जोड रस्ता देण्यात आला आहे.
या महामार्गामुळे बदलापूर शहर मुंबईच्या अधिक जवळ जाणार आहे. या रस्त्यामुळे बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा विकास होईल, असे राम पातकर (माजी नगराध्यक्ष) म्हणाले.