MIDC निवासी भागात सीसी रस्याचे काम अर्धवट; खड्ड्यात पावसाचे पाणी साचून झाले डबके, चिखल
By अनिकेत घमंडी | Published: August 23, 2023 10:10 AM2023-08-23T10:10:36+5:302023-08-23T10:11:20+5:30
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, शासन यंत्रणात समन्वयाचा आभाव
अनिकेत घमंडी, डोंबिवली:एमआयडीसी निवासी भागात एमएमआरडीए तर्फे रस्त्यांचे काँक्रीटीकरण काम काही महिन्यांपासून सुरू आहे. सुदर्शन नगर मधील ओमअगत्य सोसायटी समोरून कावेरी चौक-आजदेगाव येथे जाणाऱ्या रस्त्यावर काँक्रीटीकरण काम सुरू करण्यात आले आहे. ते पूर्ण न झाल्याने तेथील खड्ड्यात पाणी, चिखल जमा।झाला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आधीच शहरात साथ रोगांनी डोके वर काढले आहे. त्यात येथे कामानिमित्त तो रस्ता जेसीबीने रस्ता खोदल्यावर तेथे।खड्डा झाला आणि त्यात पावासाचे पाणी साचल्याने तेथे पाण्याचे डबके झाले आहे. नागरिकांना विशेषतः शालेय विद्यार्थांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होत आहे. काहीवेळा यात तोल जावून नागरिकांच्या अपघाताची शक्यता आहे. त्याबाबत तेथील एका जागरूक रहिवाशाने आपल्या घराचा बाल्कनीतून व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमांवर टाकल्यावर त्यावर नेटिझन्सकडून सबंधित यंत्रणेबद्दल संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या, त्याची दखल घेत प्रशासन जागे झाले आणि त्यांनी तात्पुरता एका बाजूने खडी/रेती टाकून नागरिकांना जाण्यासाठी पायवाट तयार केली पण सोमवारपासून पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा स्थिती जैसे थे झाली.
एमएमआरडीएने सुरवातीपासून नियोजन केले नसल्याने येथील रहिवाशांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याच्या वाहिन्या, महावितरणच्या विद्युत वाहिन्या, घरगुती आणि रासायनिक सांडपाण्याचा वाहिन्या इत्यादींचा रस्त्याखालून जाणाऱ्या वाहिन्यांची संबंधित प्रशासनाला वेळीच माहिती देऊन रस्त्यांची कामे सुरू केली असती तर या वाहिन्यांना नुकसान पोहाचले नसते. त्यात हा रस्ते बनविणारा ठेकेदार कुठल्याही वाहिन्यांना नुकसान पोहचल्यास ताबडतोब हालचाल करून उपाययोजना किंवा दुरुस्ती करीत नसल्याने सीसी रस्ते बनतील पण या यंत्रणांचे।काम निघाल्यास पुन्हा खोदकाम करण्याशिवाय पर्याय नाही अशी सगळी विचित्र अवस्था असल्याने शासन यंत्रणेत समन्वय नसल्याची टीका त्रस्त रहिवासी राजू नलावडे यांनी केली.