कल्याणमध्ये अपंग विकास महासंघाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 04:44 PM2023-12-03T16:44:02+5:302023-12-03T16:46:25+5:30
शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून आठ महिने झाले परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.
सचिन पगारे,कल्याण : शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून आठ महिने झाले परंतु, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. दिव्यांगांचे विविध प्रश्न आहेत, शासनाकडून तसेच पालिका प्रशासनाकडून त्यांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्याची खंत अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष व राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक भोईर यांनी येथे व्यक्त केली.
अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते अशोक भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमाचे आयोजन पश्चिमेकडील आधारवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी, भोईर बोलत होते.
दिव्यांग बांधवांच्या घराचे प्रश्न, महापालिका क्षेत्रात स्टाँल उपलब्ध करून देणे, दिव्यांग व्यक्ती खाजगी रूग्णालयात उपचार घेत असल्यास शासनाने अथवा संबंधित महापालिका प्रशासनाने त्याचा खर्च करावा, दिव्यांग बांधवाचा चार टक्के कोटा भरण्यात यावा, दिव्यांग भवन बांधण्यात यावे अशा विविध समस्या असून सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्रित आले पाहिजे, दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, परंतु त्या योजना राबविण्याची मानसिकता अधिकाऱ्यांची नाही. यासाठी आता दिव्यांगांनी पुढे आले पाहिजे, दिव्यांगांनी सन्मानाने जगले पाहिजे, महापालिका प्रशासनाने व्यवसायासाठी स्टाँल परवाना दिले आहेत.
परंतु काही दिव्यांग त्याचा दुरुपयोग करत असल्याची खंत भोईर यांनी व्यक्त केली.अपंग विकास महासंघाचे सचिव लक्ष्मण शिर्के, महिला अध्यक्षा माधुरी क्षीरसागर, कल्याण तालुका अध्यक्षा रोहिणी घोलप यांच्यासह पदाधिकारी आणि दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांगांना आरोग्यासाठी आभाकार्ड तसेच रेल्वे सवलत पासचे कार्ड देण्यात आले.