सलग १४ तास पोहत डोंबिवलीची जलपरी सुखजित कौरचा विश्वविक्रम
By सचिन सागरे | Published: March 15, 2023 01:52 PM2023-03-15T13:52:30+5:302023-03-15T13:52:56+5:30
सुखजीत ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून, तिने वॉटरपोलो, ट्रायथलॉन आणि व्हॉलीबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग १४ तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला. १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्मिता काटवे यांनी तयार केलेला १२ तासांचा विक्रम मोडीत काढत सुखजीतने नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तिने हा विक्रम कल्याण पश्चिमेतील न्यू वायले स्पोर्ट्स क्लब येथे केला. हा विक्रम तिने वयाच्या ४९ व्या वर्षी नोंदवत १२४६ लॅप्स (राऊंड) मारले. हा संपूर्ण प्रयत्न दोन पात्र निरीक्षकांनी पाहिला. या प्रयत्नामुळे तिचे नाव एकाच वेळी सर्वात प्रतिष्ठित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले.
सुखजीत ही लांब पल्ल्याची जलतरणपटू असून, तिने वॉटरपोलो, ट्रायथलॉन आणि व्हॉलीबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या स्मिता काटवेचा ९ वर्षांचा विक्रमही मोडला. सुखजीतला जादूच्या पुस्तकातून नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिचे नाव कथेसह रेकॉर्ड बुक्समध्ये प्रकाशित झाले आहे.
पुढेही अनेक विक्रमांना गवसणी घालायची असून यासाठी शासनाचे पाठबळ हवे आहे. पन्नास वर्षापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच लांब पल्याच्या अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवल्यानंतरही शासनाने कुठलाही पुरस्कार किंवा आर्थिक मदत न केल्याची खंत असल्याचे सुखजीतने व्यक्त केले.