वरळी, ठाणे की कल्याण? आधी काय ते ठरवा! खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आदित्य यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:19 AM2023-12-19T09:19:36+5:302023-12-19T09:19:45+5:30
डोंबिवलीत आगरी युथ फोरमतर्फे आयोजित आगरी महोत्सवात खा. शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपरोक्त उत्तर दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आदित्य ठाकरे यांनी वरळी, ठाणे की कल्याणमधून निवडणूक लढवायची ते अगोदर ठरवावे, असा टोला शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला. आदित्य हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे.
डोंबिवलीत आगरी युथ फोरमतर्फे आयोजित आगरी महोत्सवात खा. शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपरोक्त उत्तर दिले. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, ठाणे माजी महापौर रमाकांत मढवी, पदाधिकारी सागर जेधे, संतोष चव्हाण, सागर दुबे आदी उपस्थित होते. खा. शिंदे म्हणाले, स्वप्न बघण्यामध्ये गैर काही नाही. ज्या कोणालाही कल्याण मतदारसंघातून उभे राहायचे आहे त्याने खुशाल उभे राहिले पाहिजे. निवडणुकीत चुरस हवीच. पण, विरोधक चांगला पाहिजे; तरच लढाईला मजा येईल. कोण कुठून उभे राहणार याविषयी रोजच उलटसुलट विधाने करीत राहायचे हे योग्य नाही. राजकारणात अशा गोष्टी चालत नाहीत.
कामे छातीठोकपणे सांगू शकतो, मनसेला सुनावले
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधींबद्दल सर्वसामान्यांमध्ये रोष असून, त्यांना बदल हवा आहे, असे वक्तव्य करीत अप्रत्यक्षरीत्या खा. शिंदे यांना लक्ष्य केले होते. याबाबत खा. शिंदे म्हणाले की, माणूस जितकी कामे करतो तितकीच त्याच्यावर टीका होत असते. म्हणूनच आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही.
मुख्यमंत्र्यांनी मुंबईची साफसफाई केली
मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूरला विधीमंडळ अधिवेशन सुरू असताना पहाटे सहा वाजता मुंबईमध्ये येऊन मुंबईची साफसफाई केली. मुख्यमंत्री सध्या सखोल साफसफाई करीत आहेत. कारण मुंबईमध्ये खूप गाळ साचला होता. तो साफ करायची खूप गरज होती. मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता साफसफाईमध्ये सामील होईल. असेही खा. शिंदे म्हणाले.